ओबामांची लोकप्रियता अजुनही कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2016 4:01 PM
७० टक्के लोकांनी त्यांच्या कार्यकाळाविषयी समाधान व्यक्त केले.
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा केवळ सहा महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक राहिलेला आहे. गेली आठ वर्षे ते पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रध्यक्ष म्हणून जागतिक महासत्ता अमेरिकेचे नेतृत्त्व करत आहेत. या दरम्यान जागतिक महामंदी ते रिसेशन आणि देशाच्या बुडती अर्थव्यवस्थेचे शिवधनुष्य त्यांनी समर्थपणे पेलले. प्रसंगी त्यांच्या धोरणांवर टीकादेखील झाली.एका ब्रिटिश वृत्त संकेतस्थळाने ओबामांच्या अखेरच्या काळातील लोकप्रियतेचा अंदाज घेण्यासाठी सर्वेक्षण केले. १८ देशांतील १८ हजार लोकांच्या या सर्व्हेमध्ये ७० टक्के लोकांनी त्यांच्या कार्यकाळाविषयी समाधान व्यक्त केले. त्यांची निवड करणे हा एकदम योग्य निर्णय होता असे ते सांगतात. केवळ रशियातील लोकांनी ओबांमाविषयी नकारात्मक मत नोंदविले. तेथील केवळ १८ टक्के लोक ओबामांविषयी सकारात्मक आहेत.केनिया, द. कोरिया, इंग्लंड, फ्रान्स आणि आॅस्ट्रेलिया या देशांत ओबामांची लोकप्रियता जास्त आढळून आली. आगमी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत महिला उमेदवाराचा विजय झाल्यास अमेरिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल का असा प्रश्नदेखील या सर्व्हेक्षणात विचारण्यात आला होता. त्यावर ५० टक्के लोकांनी होय असे उत्तर दिले; पण तो नकारात्मक असेल की सकारात्मक हे स्पष्ट नाही. डिसेंबर २०१५ ते मे २०१६ दरम्यान हे सर्व्हेक्षण करण्यात आले. याबरोबरच ‘पिऊ रिसर्च’ या संस्थेनेदेखील बराक ओबामांच्या टिकून राहिलेल्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब केले आहे.