गोठ, पाटल्या, बांगड्या, तोडे ही पारंपरिक आभूषणं आऊटडेटेड झालेली आहेत असं वाटत असतानाच नव्यानं फॅशनमध्ये येत आहेत. लग्न, स्वत:चं असो वा अन्य कोणाचं.. लग्नातला साज, आभुषणं यांबद्दल प्रत्येकीच्याच मनात कमालीची उत्सुकता असते.
लग्नात कोणते दागदागिने घालायचे हा एक मोठाच चर्चेचा विषय होतो. अलिकडच्या काही दिवसात मात्र असं दिसून आलं आहे की तब्बल 70 टक्के जुनेच फॅशन ट्रेण्ड्स, विशेषत: दागदागिन्यांच्या आवडीनिवडीविषयक जुनेच ट्रेण्ड्स नव्यानं फॉलो केले जात आहेत. पारंपरिक दागिने जसे नथ, गोठ, पाटल्या, बांगड्या, तोडे, वाकी, बकुळहार, पैंजण, झुमके, आंबाडा असा अगदी टिपिकल साज करण्याचा मोह बहुतांश प्रत्येकच लग्नात स्त्रिया आवडीनं घालतात. अनेक ठिकाणी तर एखाद्या कुटुंबातील अबालवृद्ध स्त्रिया आवडीनं अन हौशीनं मराठमोळा पारंपरिक साज घालून, नऊवार नेसून तयार झालेल्या दिसू लागल्या आहेत. पण असं असलं तरीही जुन्या पद्धतीच्या दागिन्यांमध्ये नवा ट्विस्टही अनेक तरूण मुली आवर्जून शोधताना दिसत आहेत.
जुन्यातही नवं
1. वाकी (बाजूबंद) - काही वर्षांपूर्वी फॅशन जगतात एक असाही काळ आला होता जिथे वाकीला सहज दुर्लक्षित केले गेले होते. पण आता हीच वाकी नव्या मेकओव्हरसह महिलांच्या फॅशन जगतात स्थान मिळवू लागली आहे. स्टोन आणि चांदीच्या वाक्यांना अधिक पसंती दिली जात आहे.
2. कॉकटेल रिंग्स - एक किंवा त्यापेक्षा जास्त स्टोन्स असलेल्या कॉकटेल रिंग्स अलिकडच्या काळात इन आहेत. कोणत्याही लग्नसमारंभात या रिंग्स सहजच सगळ्यांचं लक्ष वेधतात.
3. टेराकोटा ज्वेलरी, बेबी पर्ल्स ज्वेलरी - इकोफ्रेंडली म्हणून अलिकडच्या काळात टेराकोटा ज्वेलरीलाही अनेक महिलांकडून पसंती दिली जात आहे. सोन्याचांदीच्या दागिन्यांची रिस्क नको, त्याऐवजी ठसठशीत अशी टेराकोटा ज्वेलरी अनेक बायका लग्नसमारंभात आवडीनं परिधान करून जातात. तसंच बेबी पर्ल्सलाही अनेक महिला पुन्हा नव्यानं पसंती देऊ लागल्या आहेत.
मोहिनी घारपुरे देशमुख