पेगी व्हिटसन होणार सर्वात वयोवृद्ध महिला अंतराळवीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2016 2:26 PM
५६ वर्षीय पेगी यांनी नुकतेच अंतराळात उड्डाण केले असून आगामी फेब्रुवारी महिन्यात इंटरनॅशन स्पेस स्टेशनवर ५७वा वाढदिवस साजरा करणार आहे.
नासाच्या अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नावावर लवकरच सर्वात वयोवृद्ध महिला अंतराळवीर होण्याचा विक्रम नोंदवण्यात येणार आहे. ५६ वर्षीय पेगी यांनी नुकतेच अंतराळात उड्डाण केले असून आगामी फेब्रुवारी महिन्यात इंटरनॅशन स्पेस स्टेशनवर ५७वा वाढदिवस साजरा करणार आहे.आयोवास्थित बायोकेमिस्ट पेगी तिसऱ्यांदा स्पेस मिशनवर गेलेल्या असून कमांडर म्हणून त्यांची ही दुसरी मोहिम आहे. कझाकिस्तान येथून त्यांनी रशिया आणि फ्रान्सच्या दोन तरुण अंतराळवीरांसह उड्डाण केले.नासा’मध्ये काम करणे माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. परंतु जे समाधान स्पेस स्टेशनवर काम करताना मिळते ते शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. मग ते काम छोटे का असेना, परंतु आपण मानवीकल्याणासाठी मोठे योगदान देतो आहोत ही भावना खूप सुखावणारी असे. या शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली.स्पेस मिशनची पहिली कमांडर म्हणूनही तिच्या नावे विक्रम आहे. नासाच्या पुरुष बहुल मिशनची पहिली आणि एकमेव महिला कमांडर होण्याची किमयादेखील तिने साधली आहे. रेडी टू स्पेस :पेगी व्हिटसनयापूर्वी सर्वात वयोवृद्ध महिला अंतराळवीर होण्याचा विक्रम बार्बरा मॉर्गन यांच्या नावे होता. त्यांनी २००७ साली वयाच्या ५६ व्या वर्षी उड्डाण केले होते. तसे पाहिले तर बहुमान जॉन ग्लेन यांच्या नावे असून त्यांनी वयाच्या ७७ व्यावर्षी स्पेसवारी केली होती. पेगीचा पतीसुद्धा बायोकेमिस्ट असून तोदेखील नासामध्येच कार्यरत आहे. आतापर्यंत ती ३७७ दिवस अंतराळ राहिलेली असून या सहा महिन्यांच्या तिसऱ्या मिशनसह ५३४ दिवसांचा विक्रम ती मोडणार आहे. या मिशनमध्ये तिच्यासोबत ओलेग नोव्हित्स्की (४५) आणि प्रथम स्पेसवारी करणारा थॉमस पेस्क्विेट (३८) हे दोघे आहेत.