पालकांना होतो मुलांच्या नावाचा पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2016 11:41 AM
इंग्लंडमधील दर पाचव्या पालकाला मुलांसाठी त्यांनी निवडलेल्या नावाचा पश्चाताप होतो.
मुलाच्या जन्मानंतर आणि आधीसुद्धा बाळाचे नाव काय ठेवायचे यावर पालक, कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये बराच खल केला जातो. बाळाचे नाव त्याची आजन्म ओळख ठरणार असल्यामुळे त्याबद्दल विशेष काळजी घेणे अपेक्षित असते. तुम्हाला जर तुमचे नाव आवडत नसेल तर केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या आईवडिलांनाही याबद्दल वाईट वाटत असेल. इंग्लंडमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात याविषयी एक मजेशीर बाब समोर आली आहे. इंग्लंडमधील दर पाचव्या पालकाला मुलांसाठी त्यांनी निवडलेल्या नावाचा पश्चाताप होतो. ‘मम्सनेट’तर्फे घेण्यात आलेल्या आॅनलाईन पोलमध्ये एक हजारपेक्षा जास्त पालकांनी सहभाग घेतला होता. त्यांपैकी १८ टक्के पालकांनी मान्य केले की, त्यांच्या मुलांसाठी त्यांनी निवडलेल्या नावाबद्दल खेद वाटतो. आपण यापेक्षा अजुन चांगले किंवा निदान जे आहे ते तरी नाव ठेवायला नव्हते पाहिजे, असे त्यांना वाटते.सुमारे २५ टक्के पालाकांनी आपण खूपच प्रचलित (कॉमन) नाव ठेवल्याचे सांगितले. ११ टक्के पालकांना नावाची अवघड स्पेलिंग किंवा उच्चारामुळे दु:ख वाटते. इंग्लंड आणि वेल्स भागातील सर्वात लोकप्रिय नावांचा ‘आॅफिस आॅफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स’चा अहवाल लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे करण्यात आला होता.‘मम्सनेट’चा संस्थापक जस्टीन रॉबर्टस् सांगतो की, ‘पालकांसाठी बाळाचे नाव काय ठेवायचे हा खूप मोठा प्रश्न असतो. अनेकवेळा खूप विचार-विनिमय आणि मित्रपरिवाराने सुचवलेल्या सर्व नावांचा विचार करून निवडलेले नावदेखील पालकांना नंतर अयोग्य वाटते.