पालकांनो! मुलांना बोटावर मोजायला शिकवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2016 11:21 AM
संशोधकांनी निष्कर्ष काढला की, ज्या मुलांचे ‘फिंगर पर्सेप्शन’ जास्त चांगले असते त्यांची गणितात चांगली प्रगती होते.
आपल्यापैकी बरेच जण लहानपणी बोटावर मोजूनच गणित शिकले असतील. सुरूवातील बेरीज-वजाबाकी बोटांवरच केली जाते. पण आपण जसे जसे मोठे होते तशी ही सवय कमी होते आणि आपण जास्तीत जास्त कॅलक्युलेशन्स डोक्यातच करतो. परंतु मनातल्या मनात झटपट व अचूक मोजणी करण्यासाठी या बोटांवर मोजण्याच्या सवयीचा खूप फायदा होतो.एका संशोधनानुसार ज्या लहान मुलांना आपल्या हातांची चांगली समज असते, ती मुलं गणितात अधिक हुशार असतात. त्यामुळे पालकांनी आवर्जून आपल्या मुलांना बोटांवर मोजणी करण्याची सवय लावलेली बरी.इंग्रजीमध्ये याला ‘फिंगर पर्सेप्शन’ असे म्हणतात. म्हणजे बोटांची ओळख, दोन बोटांतील फरक कळणे. याचा संबंध थेट आपल्या गणितीय कौशल्याशी असतो. एवढेच नाही तर ही सवय असणाऱ्या लोक जेव्हा मनातल्या मनात कॅलक्युलेशन्स करतात तेव्हा त्यांच्या बोटांशी संबंधीत मेंदूचा भाग सक्रीय असतो, असे संशोधनात दिसून आले.अमेरिकेतील गॅलौडेट विद्यापीठातील इलरिया बर्टेलेटी यांनी हे अध्ययन केले आहे. लहान मुलांचा मेंदू कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी त्यांनी आठ ते तेरा वयोगटातील ३९ विद्यार्थ्यी मनातल्या मनात एक अंकी वजाबाकी व गुणाकार करत असताना त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंग केले. तेव्हा असे दिसून आले की, वजाबाकीसाठी मुले बोटांचा वापर करत नसतानांही बोटांशी निगडित असलेले मेंदूचे दोन्ही ‘सोमॅटोसेन्सरी’ भाग सक्रीय होते. परंतु गुणाकार करताना अशी सक्रीयता आढळली नाही. मुले वजाबाकी व गुणाकार कशा प्रकारे शिकतात, त्या पद्धतील फरकामुळे, असे होत असावे असा संशोधकांचा अंदाज आहे.अध्ययनाअंती संशोधकांनी निष्कर्ष काढला की, ज्या मुलांचे ‘फिंगर पर्सेप्शन’ जास्त चांगले असते त्यांची गणितात चांगली प्रगती होते.