- मोहिनी घारपुरे-देशमुखकुठेही जायचं म्हटलं तर एखादी लहानशी पर्स, बॅग, बटवा वगैरे सोबत नेण्याला केवळ खिसे हा एकमेव उत्तम पर्याय आहे. मध्ययुगात तर स्त्रियांच्या पोषाखालाच चक्क अशा पर्सेस, बटवे जोडलेले असत. अत्यंत भरीव कलाकुसर असलेले बटवेसदृश असलेल्या या खिशांचा आकार इतका मोठा होता की त्यात कंगवा, सेंटच्या बाटल्या, लेखन साहित्य, पैसे, चष्मा, चाव्या, घड्याळ आणि एखादा मफिनच्या आकाराचा केकसुद्धा नेटका बसत असे.
कालांतरानं म्हणजे साधारण सतराव्या शतकाच्या सुमारास पुरूषांच्या पोषाखामध्ये खिशांचा जन्म झाला. पोषाखाला एक लहानशी फट ठेवून त्या ठिकाणी खिसे शिवले जाऊ लागले. कोट, सूट आणि ट्राऊजर्सला खिसे शिवण्याची फॅशन आली. तर महिलांच्या झग्याच्या आतील पेटीकोटला खिसे जोडलेले असत. या खिशांमध्ये हात घालण्यासाठी झग्यावरून कमरेच्या दोन्ही बाजूला, खिशांच्या बरोबर वर येईल अशा रितीनं फट ठेवली जात असे. विशेष म्हणजे हे खिसे वरून दिसत नसत. शिवाय, अनेकदा, हातानं शिवलेले खिसे एकमेकांना भेट स्वरूपातही दिले जात. वेस्टकोटला किंवा स्त्रियांच्या पेटीकोटला मॅच होतील असे खिसे स्वतंत्रपणे शिवले जात असत. त्यासाठी कधी जुने कपडे किंवा कापड वापरलं जात. दुकानांमध्ये रेडीमेड खिसे आणि खिसे शिवण्यासाठी लागणारं कापड, दोन्हीही विकलं जात असे. हे खिसे तेव्हा इतके प्रचलित होते की त्याकाळात खिसेकापूंचाही चांगलाच सुळसुळाट झाला होता.
1790 च्या आसपास मात्र ही फॅशन कशी कोण जाणे पण मागे पडली. खिशांमुळे पोषाखाचं सौंदर्य कमी होतं असा एक विचारप्रवाह फार जोमानं पसरला आणि त्यामुळे खिसे शिवून घेण्याची फॅशन कमी होत गेली. त्याऐवजी सुंदर आकर्षक पर्सेस, बॅग्स वापरण्याचीच लाट आली.
अलिकडे, पुरूषांच्या पोषाखात खिशांचं स्थान अविभाज्य झालं असलं तरीही स्त्रियांच्या पोषाखात मात्र खिसे आजही आवडीप्रमाणे शिवले जातात. खिशांचे अनेक प्रकारही प्रचलित असले तरीही, खिसे असावेत की नाही याबाबत मात्र मतमतांतर महिलांमध्ये पाहायला मिळतात. किंबहुना खिसेवाला ड्रेस अशी क्रेझ काही महिलांना वाटते तर अगदी त्याउलट खिसा बिसा नको बाई, खिसा म्हणजे अगदी पुरूषीच वाटतं, असं म्हणणा-या स्त्रियांची संख्याही तुलनेनं जास्त आहेच. त्यातही जीन्स किंवा शर्टला खिसा असेल तर एकवेळ चालतो पण पंजाबी ड्रेसला, मॅक्सीला वगैरे खिसा अजिबात नको असं म्हणणा-या महिलाही आहेत. आणि त्याउलट, सोयीचं जातं म्हणून आवर्जून आपल्या सलवार सूटला वेगवेगळ्या प्रकारचे खिसे हमखास शिवून घेणा-या महिलाही तुरळक का होईना दिसतात. विशेषत: नोकरदार महिलांना खिसे असलेले पोषाख बरे पडतात, मोबाईल, पैसे आणि चाव्या कॅरी करायला खिसे पाहिजेत म्हणजे वेगळी बॅग, किंवा पर्सचं ओझं कॅरी करायला नको असं म्हणणा-याही महिला आहेत.
एकंदरीतच, खिसे हा एक अत्यंत स्टायलिश प्रकार असला तरीही खिशांची आवड मुळातच असायला लागते. पुरूषांना त्यांच्या पोषाखात खिसे न वापरण्याचा पर्यायच उपलब्ध नाही. शक्यतो शर्ट किंवा ट्राऊझर्स, जीन्सला खिसे असतातच आणि ते सोयीचेही पडतात त्यामुळे पुरूषांच्या पोषाखाचा काहीसा महत्त्वाचा घटक असलेले खिसे, स्त्रियांसाठी मात्र आॅप्शनल आहेत.
खिशांचे स्टायलीश प्रकार
* पॅच पॉकेट* फ्लॅप पॉकेट* स्लिट पॉकेट* स्लॅश पॉकेट* झिपर पॉकेट* कांगारू पॉकेट* युटिलिटी पॉकेट* हिडन पॉकेट* जीन्स पॉकेट* कव्हर्ड पॉकेट* टिकीट पॉकेट* कार्गो पॉकेटतर असे हे खिसे.. असले तर छान, सोयीचेच असतात. पोषाखाला स्वतंत्र ओळख देणा-या खिशांचा फॅशन जगतातही मोठा बोलबाला आहे.