बेंगलोरमध्ये रंगणार ‘काव्य महोत्सव’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2016 5:18 PM
बेंगलोरात पुढील महिन्यात प्रथमच ‘काव्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
काविता व्यक्तीच्या मनातील भावना व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे, असे म्हणने अतिशयोक्ती ठरू नये. कारण काव्याची तरलता आपल्या भावनाविश्वाला साजेशी असते. सध्या मात्र कवितेला बुद्धीवादी किंवा अभिरुची संपन्न वर्गाच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. एकेकाळी भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देशभक्तांच्या नसांमध्ये भरणारी ही कविता आता मात्र केवळ पाठ्यपुस्तकांच्या पानांपुरती मर्यादित झाली आहे.काव्याविषयी जनसामान्यांत रुची उत्पन्न व्हावी यासाठी बेंगलोरात पुढील महिन्यात प्रथमच ‘काव्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. स्थानिक आणि नव्या कवींना जावेद अख्तर, पियुश मिश्रांसारख्या नावाजलेल्या कवींसोबत आपली कविता सादर करण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे. सहा ते सात आॅगस्ट दरम्यान लीला पॅलेस येथे हा काव्य महोत्सव रंगणार आहे.महोत्सवाचे आयोजक, सुबोध शंकर यांनी सांगितले की, कविता ही स्वत:ला व्यक्त करण्याचे सक्षम माध्यम आहे. पण अनेक साहित्य संमेलनांमध्ये कवितेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. एखाद-दोन कार्यक्रम वगळता अशा संमेलनांमध्ये कवितेला विशेष स्थान नसते. परंतु आपल्या देशातील अनेक क वी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडत असताना संपूर्णपणे कवितेला वाहिलेला महोत्सव आयोजित करण्याची आम्हाला गरज वाटली.बेंगलोर शहरातील विविध काव्य ग्रुप्सच्या सहकार्याने हा महोत्सव साकरत आहे. यामध्ये काव्य वाचन, काव्यशास्त्र, काव्यअभिरुची, संगीत प्रधान कविता आणि काव्य प्रकाशन अशा विविध विषयांवर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.