‘पोकेमॉन’ने जगाला याड लावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2016 12:58 PM
‘पोकेमॉन गो’ हा गेम अँड्राईड आणि आयफोनसाठी लाँच झाला आहे. आतापर्यंत पन्नास लाखांपेक्षा जास्त वेळा तो डाऊनलोड झाला आहे.
‘हिस्ट्री रीपिटस् इटसेल्फ’ म्हणजेचे इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. नव्वदच्या दशका धुमाकुळ घातलेला ‘पोके मॉन’ आता सुपरफास्ट इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या युगात नव्या रुपात दाखल झाला आणि पाहता पाहता सगळ्या जगाला ‘याड लावलं’. आॅस्ट्रेलियामध्ये तर या गेममुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडत आहे.‘पोकेमॉन गो’ हा गेम अँड्राईड आणि आयफोनसाठी लाँच झाला आहे. आतापर्यंत पन्नास लाखांपेक्षा जास्त वेळा तो डाऊनलोड झाला आहे. फोन कॅमेरा, मोबाईल जीपीएसच्या आधारावर आपल्या शहरातील रिअल जागी पोकेमॉन शोधण्याची झिंग युजर्सवर एवढी वाढत आहे की, लोक जास्तीत जास्त पोकेमॉन कैद करण्यासाठी स्क्रीनमध्ये डोळे खुपसून शहरभर फिरत आहेत.असे करत असताना ते खासगी जागा आणि इमारतींमध्येदेखील जात आहेत. सिडनीमध्ये पोलिसांनी लोकांना आव्हान केले की, गेम म्हणून ठीक आहे परंतु इतरांच्या प्रापर्टीमध्ये प्रवेश करू नका. लोकांचा उत्साह एवढा शिगेला पोहचला आहे की , गेम सर्व्हर अनेक वेळा क्रॅश झाले. सोशल मीडियावर लोक आपला संताप व्यक्त करत होते. आॅस्ट्रेलियामध्ये #पोकेमॉनगो हा हॅशटॅग टॉप ट्रेंडिंग ठरला.पोकेमॉनमुळे लोक आणखी किती आहारी जातात याकडे अनेक जणांनी लक्ष वेधले. लोक ट्विट करत होते की, ट्रेनमध्ये, रस्त्यांवर लोक मोबाईलमध्ये पाहत, आजुबाजूला कशाचीही पर्वा न करत फिरत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.