- मोहिनी घारपुरे - देशमुखपोल्का डॉट्स किंवा बॉबी प्रिंट्स आज आठवण्याचं कारण म्हणजे, आज व्हॅलेन्टाईन्स डे.. ग्लॅमडॉल वगैरे नसलेल्या साध्या सामान्य मुलींच्या वॉर्डरोबमध्ये पोल्का डॉट्सवाला एखादा तरी टॉप, कुर्ती, मॅक्सी, गाऊन हमखास असतोच. आणि विशेष म्हणजे, आजसारख्या विशेष प्रसंगासाठी मुली हमखास तो राखून ठेवतात.तर, फॅशनच्या जगतात या पोल्का डॉट्सनी 1926 मध्ये प्रवेश केला. तत्कालीन मिस अमेरिका असलेल्या मॉडेलचा पोल्का डॉट्स असलेल्या स्विम सुटमधला फोटो झळकला आणि सगळ्या जगाचं या पोल्का डॉट्सकडे लक्ष वेधलं गेलं. त्यानंतर 1928 साली डिस्नेच्या कार्टून कॅरेक्टर मिनी माऊसनं लाल कपड्यांवर पोल्का डॉट्स असा अवतार घेऊन लोकांना भुरळ पाडली. आणि त्यानंतर या पोल्का डॉट्सनी फॅशन इंडस्ट्रीत एकच धुमाकूळ घातला. अगदी 1930 पर्यंत, म्हणजे दोन वर्षातच अमेरिकेच्या बाजारपेठेवर या पोल्का डॉट्सचंच साम्राज्य निर्माण झालं होतं.
पोल्का डॉट्स एंड मूनबीम्स हे 1940 साली फ्रँक सिनात्राचे गाणेही गाजले आणि त्या गाण्याने अमेरिकेची पोल्का डॉट्सची क्रेझ जगासमोर आणली.
1951 मध्ये मर्लीन मन्रोचा पोल्का डॉट्सवाल्या बिकीनीतला फोटो झळकला आणि पुन्हा एकदा फॅशनच्या दुनियेत धूम झाली. व्होग मासिकानं तर पोल्का डॉट्सची कित्येकदा दखल घेतली. जापनीज आर्टिस्ट यायोई कुसामा यांच्या कलाकृतीत मोठ्या संख्येने झळकणारे पोल्का डॉट्स यांनी जगाला थक्क करून सोडले आणि 60 च्या दशकात तर याच पोल्का डॉट्सनी जगाला यायोई कुसामांची ओळख करून दिली. ‘आपली पृथ्वी ही या विशाल विश्वपटलावर जणू एक पोल्का डॉट आहे’ असा वेगळाच विचार यायोर्इंनी जगाला दिला.
पोल्का शब्दाचा अर्थच पॉलिश वुमन असा होतो. झेकमध्ये पोल्का शब्दाचं भाषांतर, लहान मुलगी किंवा छोटीशी स्त्री असं होतं आणि त्यामुळेच हे डॉट्स आॅटोमॅटीकली महिलांच्या फॅशन जगतावर राज्य करताना दिसतात.
असं असलं तरीही, पुरूषांनीही या पोल्का डॉट्सला पसंती दिल्याची साक्ष इतिहास देतो. 1962 मध्ये मार्व्हल कॉमिक्सने ‘पोल्का डॉट मॅन’ या सुपरहीरोला जन्म दिला. त्यानंतर 1965 मध्ये बॉब डिलॅन हिरवा पोल्का डॉटेड शर्टमध्ये झळकला आणि ही फॅशन पुरूषांनीही आपलीशी केली.
भारतात साधारणत: 70 च्या दशकात पोल्का डॉट्सची फॅशन मोठ्या जोमानं पसरण्याचं श्रेय जातं बॉबी पिक्चरला. बॉबी फिल्ममधल्या डिंपल कपाडीयानं घातलेल्या पोल्का डॉट्सवाल्या ड्रेसमुळे भारतात या प्रिंटचं नावच बॉबी प्रिंट पडलं. या बॉबी प्रिंट्स आपल्याकडेही तूफान लोकप्रिय झाल्या. हिरोंनाही बॉबी प्रिंट्सचे शर्ट वापरण्याचा आणि त्यावर टायऐवजी बो लावून मिरवण्याचा मोह आवरला नाही. अनेक चित्रपटात नटांनीही बॉबी प्रिंट्सचे शर्ट घातल्याचे दिसून येते.
तर असे हे पोल्का डॉट्स. साधे, सिंपल आणि तरीही प्रचंड मोहक. काय जादू आहे या पोल्का डॉट्सची माहीत नाही पण कपड्यांवर हे डॉट्स पसरले की रूप खुलतं हे नक्की. मग ती अगदी ऐश्वर्या राय असो किंवा आपण स्वत:!