- सारिका पूरकर-गुजराथी
लहानपणापासूनच शुभंकरोतीच्या या ओळीतून दिव्याचे, त्याच्या प्रकाशाचे महत्व आपल्याला माहित झालंय. प्रकाशकिरणांचा शोध लागला आणि मानवी आयुष्य लख्ख प्रकाशानं उजळून गेलं. रॉकेलवर चालणारे कंदील मागे पडले आणि हळूहळू बल्बनं भिंतीवर जागा पटकावली. त्यानंतर आल्या ट्यूबलाईट्स आणि नंतर तर मग दिव्यांच्या अनेक सुंदर आणि विविध प्रकारांची एक वेगळी दुनियाच तयार झाली. रात्रीसाठी डीमलाईट आले, टेबललॅम्प आले, घरातील प्रत्येक खोलीच्या रचनेनुसार, त्याच्या वापरानुसार लाईट आले, बाथरुमसाठी वेगळे, आॅफिससाठी वेगळे., दुकानं आणि शोरुम्ससाठी वेगळे. फ्लोरोसंट, एलईडी असे कितीतरी दिवे आले. आता हे दिवे नुसतेच प्रकाश देणारे दिवे राहिले नाहीयेत तर घर सजावटीत मुख्य भूमिका बजावणारे महत्त्वाचे घटक बनून गेले आहेत. यासाठीच कोणत्या खोलीत कोणता बल्ब/लाइट लावायचा हे ठरवलं आणि ते ठरवताना थोडी कल्पकता आणि सौंदर्यदृष्टी दाखवली तर लाइट त्या त्या खोलीत प्रकाशही देईल आणि ती खोली खास निवडून लावलेल्या दिव्यांमुळे मस्त आर्टिस्टिकही दिसेल. यासाठी या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी पडतील!
१) लिव्हिंग रुम अर्थात दिवाणखाना (बैठक)
बैठकीची खोली ही घरातील एक अशी खोली आहे की जिथे तुम्ही दिवसातील सर्वात जास्त वेळ घालवता. निवांत बसून गप्पा मारणं, टीव्ही बघणं, पेपर किंवा पुस्तक वाचणं अशा बऱ्याच गोष्टी या खोलीत बसूनच करत असतात. त्यामुळे या खोलीसाठी डाऊनलाईट्स हा प्रकार शक्यतो टाळा. या खोलीत छतावरुन थेट खाली प्रकाश देणारे लाईट्स वापरा. म्हणजे सर्व खोली व्यवस्थित प्रकाशमान होईल. या दिव्यांमुळे प्रकाशाचा फ्रेशनेस निर्माण होतो शिवाय सावल्याही पडत नाहीत. बैठकीत प्रकाश आणखी व्यवस्थित पसरवायचा असेल तर काचेचे, लाकडाचे किंवा मेटलचे आडवे चौकोनी खांब उभारुन त्याच्या आतील बाजूस दिव्यांची रचना केली जाते. यामुळे प्रकाश भिंतीवर पडून मग इतरत्र पसरतो. खोली मोठी असेल तर दोन भिंतींवर हे खांब उभारुन ही रचना करता येते. या खोलीत तुमच्या पुस्तक वाचण्याच्या खुर्चीशेजारी, एखाद्या कॉर्नरपीसवर किंवा डेस्कवर सुंदर टेबल लॅम्प लावूनही खोलीची शोभा वाढवता येते. तसेच घरात फायरप्लेस, बूककेस किंवा भिंतीवर छानसं पेंटिग, म्युरल असेल तर तेवढ्याच भागाला हायलाईट करणारा अॅक्सेंट लायटनिंग हा प्रकार ट्राय करा. दिव्यांची ट्रॅक रचना हा देखील अत्यंत कल्पक पर्याय आहे. याव्यतिरिक्त भिंतीवर लावता येतील असे शिल्ड लॅम्प, विविध आकारातील लॅम्पस ट्राय करा. एकच मोठी ट्यूबलाईट बसवली की झाली दिव्यांची सोय असं आता राहिलेलं नाहीये. आता आपण निवडलेल्या दिव्यातून घराला कलात्मक टच मिळावा अशीही अपेक्षा आहे. म्हणूनच बैठकीच्या खोलीसाठी ल्युमेन बल्बची रचना हा ट्रेण्ड हिट ठरलाय. खोलीच्या आकारानुसार या दिव्यांची संख्या ठरवावी लागते.
२) किचन
संपूर्ण घराची पोटा-पाण्याची सोय बघणारी ही घरातली महत्त्वाची जागा. स्वयंपाकघर लहान-मोठं-प्रशस्त असू शकतं. मात्र येथे दिव्यांची रचना करताना संपूर्णत: वेगळा विचार करावा लागतो. कारण किचनमधील वर्क प्लेस वेगळी असते. किचनमधील कामं किचन ओटा, बेसिन याठिकाणी सर्वात जास्त वेळ चालतात. त्यामुळे प्रकाशयोजना करताना या ठिकाणांवरच लक्ष केंद्रित करायला हवं. किचन ओटा, बेसिनजवळ शक्यतो खिडकी असतेच. त्यामुळे दिवसा त्यातून येणारा नैसर्गिक प्रकाश पुरेसा ठरतो. रात्रीसाठी मात्र अंडर कॅबिनेट रचना उपयुक्त ठरते. किचन ओट्याच्या वरच्या भागावर तुम्ही लाकडी कॅबिनेट्स बसवले असतील तर त्याच्या खालच्या भागावर नाहीतर माळा असेल तर त्याच्या खालच्या भागावर दिवे बसवायला हवे. एलइडी किंवा फ्लोरोसेंट लाईट्स मस्त पर्याय आहे यासाठी. म्हणजे प्रकाश थेट किचन ओट्यावर, गॅसशेगडीवर पडेल आणि स्वयंपाक करताना प्रकाशाचा ताळमेळ साधला जाईल. पेंडंट स्टाईल हा प्रकार देखील तुम्ही ट्राय करु शकता. किचन मोठे असेल आणि किचन ओटा सोडून मध्यभागी काही टेबल्स असतील तर त्याच्यावर पेंडंट प्रकाशयोजना करता येते. सिंकवर रात्री प्रकाशासाठी सॉफिट स्टाईल दिवे बसवले जाऊ शकतात.
३) बेडरुम आणि बाथरुम
बेडरुममध्ये बेडजवळ आणि क्लोजेटजवळ प्रकाशयोजना करावी लागते. बेडरुममध्ये शक्यतो थेट भिंतीवर लावण्यात येणाऱ्या दिव्यांची रचना करावी. यासाठी बाजारात आकर्षक फिक्चर्स मिळतात. त्यांचा वापर करावा. हे फिक्चर्स हवे तसे फिरवता, वळवता येतात. त्यामुळे संपूर्ण खोलीत प्रकाश मिळवणं सोपं जातं. छानसा टेबललॅम्प तुम्ही बेडजवळील डेस्कवर ठेवला तर सजावट पूर्ण होते. बाथरुममध्ये एरवी छतावर मध्यभागी आणि आरशाच्या वर असे दिवे बसवले जातात. मात्र सध्या तीन भिंतीवर फिक्चर्सच्या सहाय्यानं दिवे बसवण्याचा ट्रेण्ड आहे.
४) डायनिंग रुम आणि यार्ड
डायनिंग टेबल स्वतंत्र खोलीत असेल तर तिथेही तुम्हाला टेबलवर फोकस होणारी दिव्यांची रचना करावी लागते. त्यासाठी टेबलच्या मध्यवर्ती भागाच्या वर दिवे बसवू शकता. तसेच डीमर्सचा वापर करु शकता. यामुळे शांत अनुभूती मिळते.घराभोवती असलेल्या यार्ड परिसरात दिवे बसवायचे असल्यास तीन टप्प्यात ते बसवावे. घराला लागून, मध्यभागी आणि एका कोपऱ्यात अशा प्रकारे दिव्यांची रचना करावी. परसबाग, अंगण, यार्ड मोठं असलं म्हणजे जास्त दिवे हा समज काढून टाका. मुख्य दरवाजाजवळ तुम्ही जास्त प्रकाश देणारे दिवे लावू शकता. अशाच ट्रिक्स घरातील आॅफिस, बाल्कनी आणि जिन्यात वापरुन कल्पक प्रकाशयोजना करता येते.