20 हजार कोटी रुपयांची राजेशाही समेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2016 9:03 PM
दोन वर्षांपूर्वी गायकवाड कुटुंबातील दोन चुलत भावांनी दोन दशकांपासून चालत आलेले भांडण संपुष्टात आणले.
राजेशाही आणि अब्जाधीश कुटुंबातील वाद तशी नवी गोष्ट नाही. अंबानी बंधूंचा वाद तर सर्वश्रुत आहे. संपत्ती आणि वारस हक्कांवरून होणारे मतभेद अनेक वेळा टोकाला जातात आणि पीढी दर पीढी कुटुंबातील सदस्यांचे वैमनस्य वाढत जाते.अशा कुटुंबानी बडोद्याच्या गायकवाड राजघराण्याकडून शिकवण घेतली पाहिजे. दोन वर्षांपूर्वी गायकवाड कुटुंबातील दोन चुलत भावांनी सुमारे दोन दशकांपासून चालत आलेले भांडण गुण्यागोविंदाने संपुष्टात आणले.वीस हजार कोटी रुपयांच्या संपत्तीवर हा वाद सुरू होता. समरजीतसिंह आणि प्रतापसिंह गायकवाड या बंधूनी कुटुंबात शांती आणि पुढच्या पीढीला या वादाची झळ न बसू देण्यासाठी समेट घडवून आणली.नुकतेच एका कार्यक्रमात प्रतापसिंह यांनी कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी सांगितले की, ‘प्रत्येक सदस्याने संपूर्ण कुटुंबाच्या हिताचा विचार करून वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवावेत. आमच्या घराण्याच्या वादाबद्दल सांगायचे तर, एवढी वर्षे वाद लांबल्यामुळे त्याचा परिणाम आमच्या दैनंदिन जीवनावर होत होता. रोज सकाळी उठले की त्याच त्याच गोष्टींचे विचार मनात घोळत असल्यामुळे वातावरण नकारात्मक होऊ लागले. शांतपणे विचार करून मग आम्ही यावर कायमचा तोडगा काढण्याचे ठरवले.’