जगातील सर्वात छोट्या कारची विक्री तब्बल १ करोड १६ लाखाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2016 4:32 PM
पील पी50 ही जगातील सर्वात छोटी कार आहे
. त्यामुळे तिची किंमत ही खूप कमी असेल असे आपल्याला वाटत असेल. परंतु, सर्वात छोटी असणाºया या कारची विक्री तब्बल १ करोड १६ लाख रुपयांमध्ये झाली आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात झालेल्या एका लिलावात या कारची विक्री झाली आहे. आरएम सदबीजने हा लिलाव आयोजित केला होता. ही छोटीसी कार एवढ्या किंमतीत विक्री होईल हे आयोजकांना वाटत नव्हते. कारण त्यांना या कारची ५० ते ६५ लाखात विक्री होईल असे वाटत होते. परंतु, जेव्हा या कारचा लिलाव सुरु झाला तेव्हा तिची बोली ही वाढतच गेली. त्यानंतर १ करोड १६ लाख ही सर्वात मोठी बोली लावून ही कार विक्री करण्यात आली. पील पी50 च्या मॉडेलमध्ये सर्वात मोठी बोली लागणारी ही कार आहे. पील पी50 साठी हा एक नवा जागतीक विक्रमच झाला आहे. ही कार जगातील सर्वात लहान असून, ब्रिटेनमध्ये तयार करण्यात आलेली आहे. अर्ल्स कोर्ट येथे १९८२ मध्ये झालेल्या सायकल व मोटारसायकल शो साठी ती तयार करण्यात आली होती. कंपनीने अशा ५० कार तयार केल्या होत्या. आज जगात फक्त २६ पील पी50 कार शिल्लक असून, ही कार पहिल्यांदा १९६२ मध्ये बनविण्यात आली होती. तर १९६४ मध्ये या कारचे उत्पादन बंद करण्यात आले होते. त्यानंतरला पुन्हा या कारचे उत्पादन सुरु करण्यात आले. परंतु, १९६२ ते ६४ या काळात तयार करण्यात आलेल्या कार या खूप बहुमुल्य आहेत. या कारची लांबी ५४ इंच आहे. यामध्ये एक हेडलाईट व एकच दरवाजा आहे. कारला ४९ सीसी ची क्षमता असलेल्या २ स्ट्रोक सिंगल-सिलेंडर इंजिनची लैस आहे. जो ४.५ हॉर्सपावरची ताकद देतो. ३ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सिस्टम असलेल्या या कारमध्ये केबल आॅपरेटेड थ्री -वील ड्रम ब्रेक्स आहे. एक लिटर तेलामध्ये ही कार ३५ किमी एवढे अव्हरेज देते.