चीनमधील हा पुतळा पाहून इतर सर्व पुतळे वाटतील ठेंगणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2016 8:52 AM
चीनमधील प्राचीन योद्धा गुआन यू याचा १५७ फुटांचा महाकाय पुतळाचे नुकतेच अनावरण झाले.
महापुरुषांचे पुतळे उभारण्याची आपल्याकडे भलतीच आवड आहे. याच पुतळ्यांवर वादविवाद, राजकारण होते ते वेगळे. असे पुतळे खरोखरंच गरजेचे आहेत का? हा मुद्दा येथे गौण पडतो. पण ज्यांना अशा पुतळ्यांची आवड आणि भव्यदिव्य पुतळे उभारण्याच्या प्रयत्नात असलेल्या सर्वांनी चीनचे तिकिट बुक करावे कारण चीनमध्ये आॅल-टाईम गे्रट पुतळा उभारण्यात आला आहे.चीनमधील प्राचीन योद्धा गुआन यू याचा १५७ फुटांच्या महाकाय पुतळाचे नुकतेच अनावरण झाले. ३३ फुट लांब युद्धनौकेच्या प्रतिकृतीवर हा अजस्र पुताळा उभा असून त्याच्या हातात ‘ग्रीन ड्रॅगन क्रेसेंट ब्लेड’ नावाचे लांबलचक परशु हत्यार आहे. हुबेई प्रांतातील जिंगझोऊ शहरात उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे १३२० टन वजन असून त्याचे नुसते हत्यारच १३६ टन एवढे अवजड आहे. चार हजारांपेक्षा जास्त तांब्याचे पट्टे पुतळयाला चिकटवण्यात आलेले आहेत. एवढेच नाही तर पुतळ्याच्या बैठकीत म्हणजे युद्धनौकेत गुआन यू चे संग्राहलयदेखील आहे. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये ‘त्रिसाम्राज्या’च्या काळात गुआन यू हा सेनापती होऊन गेला होता. हान राजवंशाच्या पतनास कारणीभूत गृहयुद्धाचे त्यांनी नेतृत्त्व केले होते. सध्या त्याच्याबद्दल पुरेशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. जी आहे ती केवळ दंतकथांच्या स्वरुपात. लु गुआन्झाँग लिखित ‘रोमॅन्स आॅफ द थ्री किंग्डमज्’ या सुप्रसिद्ध कांदबरीतील पात्राने गुआन यूला अजरामर करून टाकले आहे. चीनमधील अनेक पंथ त्याची देवाप्रमाणे पुजा करतात. निष्ठा आणि प्रामाणिकपणाचा महामेरू म्हणून गुआन यूचे संपूर्ण देशात पुतळे दिसून येतात. मात्र जिंगझोऊ प्रांतातील या पुतळ्यासमान कोणी नाही.