विवाहित असण्यापेक्षा सिंगलच चांगले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2016 11:42 AM
एका मानसशास्त्रज्ञाने दावा केला आहे की, विवाहित लोकांपेक्षा अविवाहित लोकच जास्त चांगल्या प्रकारे आपले आयुष्य जगतात.
आपल्या समाज व्यवस्थेत अविवाहित असणे किती अवघड आहे हे तर आपण सर्व जण जाणतोच. मग तो पुरुष असो स्त्री, एका ठराविक वयानंतर दोघांवरही लग्न करण्याचा दबाव वाढू लागतो. लग्न केल्यामुळे व्यक्तीचे आयुर्मान वाढते, तो अधिक आनंदी आयुष्य जगतो अशी काहीशी समजुत असते.ती खोडून काढत एका मानसशास्त्रज्ञाने दावा केला आहे की, विवाहित लोकांपेक्षा अविवाहित लोकच जास्त चांगल्या प्रकारे आपले आयुष्य जगतात.डेन्व्हर येथे संपन्न झालेली ‘अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’च्या वार्षिक परिषदेमध्ये प्रा. बेला डीपाऊलो यांनी हा दावा केला आहे. अविवाहित लोकांवर मागील तीस वर्षांत केलेल्या ८०० पेक्षा जास्त संशोधनांचा सखोल अभ्यास त्यांनी केला आहे. त्या म्हणतात, उपलब्ध निष्कर्षांवरून तरी असे दिसते की, जे लोक अविवाहित राहतात त्यांचे स्वत:बद्दल अवलोकन हे त्यांच्या विवाहित सहाकऱ्यांपेक्षा जास्त चांगले असते. एक व्यक्ती म्हणून त्यांची नियमित वृद्धी आणि शाश्वत विकास होत असतो.त्याबरोबरच सिंगल लोक आपल्या कामाबद्दल अधिक आदर बाळगतात, तसेच ते मोठ्या प्रमाणात स्वावलंबी असल्यामुळे नकारात्मक भावना, विचारांचा त्यांच्या कार्यक्षमतेवर जास्त परिणाम दिसून येत नाही. याउलट विवाहित लोकांची कहाणी आहे. तुम्हाला काय वाटते मग? लग्न करावे की नाही?इंग्लंडचा विचार केला असता तेथे आॅफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी १.६२ कोटी लोक सिंगल तर विवाहितांची संख्या २.३७ कोटी आहे. प्रा. डीपाऊलो सांगतात, लग्न न करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे कारण लोकांना सर्वोत्तम, अर्थपूर्ण आणि मोकळ्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. या मानसशास्त्रज्ञदेखील अविवाहितच आहेत.