आता इन्स्टाग्रामने सुरू केली स्नॅपचॅटची कॉपी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2016 1:14 PM
इन्स्टाग्राम युजर्स आता एखादा फोटो किंवा व्हिडियो/स्लाईडशो केवळ २४ तासांसाठी पोस्ट करू शकतील.
सोशल मीडिया जगतात आपली मक्तेदारी टिकून ठेवण्यासाठी फेसबुक जोरदार प्रयत्न करीत आहे. जगभरातील तरुणांमध्ये ‘स्नॅपचॅट’ अॅप प्र्रचंड प्रसिद्ध होत असताना कंपनीने त्याला उत्तर म्हणून आपल्या इन्स्टाग्राम युजर्सना नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.इन्स्टाग्राम युजर्स आता एखादा फोटो किंवा व्हिडियो/स्लाईडशो केवळ २४ तासांसाठी पोस्ट करू शकतील. म्हणजे २४ तासांनंतर तुमचे फॉलोवर्स तो फोटो/व्हिडियो पाहू शकणार नाही. ‘वेळमर्यादे’चे हे फीचर स्नॅपचॅटच्या मुख्य फंक्शनसारखेच आहे. स्नॅपचॅटवर पाठलेला संदेश/फोटो काही ठराविक वेळानंतर डिलीट होतो.वयाच्या तिशीच्या आतमधील तरुणांमध्ये स्नॅपचॅट सर्वाधिक पॉप्युलर होत आहे. ज्या तरुणांना आपल्या घरच्यांपासून आपली सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी दूर ठेवायची आहे, त्यांच्यासाठी स्नॅपचॅटचा सशक्त आणि आकर्षक पर्याय आहे. त्याला शह देण्यासाठी कंपनीने वेळमर्यादा देण्याचा निर्णय घेतला.स्नॅपचॅटच्या मेमेरीज फीचरप्रमाणेच ‘इन्स्टाग्राम स्टोरीज’ हे नवे फीचर कंपनीने अमेरिकेत लाँच केले आहे. याद्वारे तुम्ही वेळमर्यादा ठरवून देण्याबरोबरच पोस्ट अपलोड करणाऱ्याला ‘डिरेक्ट मेसेज’ करू शकता; मात्र ‘लाईक’ किंवा ‘कॉमेंट’ नाही करू शकणार. आगामी काही आठवड्यांत इतर देशांतील यूजर्ससाठीदेखील ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फेसबुकने २०१२ साली ‘इन्स्टाग्राम’ला एक बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केले होते. त्याच वेळी स्नॅपचॅटने झुकेरबर्गची तीन बिलियन डॉलर्सची आॅफर नाकारली होती. आज स्नॅपचॅटची किंमत १८ बिलियन डॉलर्सएवढी आहे.