- निशांत महाजनइंटरनेटवर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. गेले काही दिवस व्हायरल वादळ आहे, ते या शब्दांचं. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय? काय गहजब केलाय या गाण्यानं? आणि मुख्य म्हणजे नुस्ते यूट्यूब आणि पर्सनल व्हॉट्सअॅप चॅटवर क्लिप टाकणं नाही, तर जो तो आपापल्या ग्रूपचं हे सोनू सॉँग शूट करून व्हायरल करू लागला आहे.त्यातही ट्रेकिंगला जाणारे ग्रुप. मुळात हे जुनं ट्रेकिंगचं गाणं. त्याला आता नवा तडका बसला. कसा बसला, का बसला याला या व्हायरल नेट ट्रेण्डमध्ये काही अर्थ नसतो. तो व्हायरल का होतो याचं काही लॉजिक नसतं. पण हे सोनू सॉँग असं काही व्हायरल झालंय की मराठीच कशाला गुजराथी, हिंदी, पंजाबी, भोजपुरी भाषांतही ते अनेकांनी ट्रान्सलेट करून गायलं. आणि गाणं तरी कसं, एक गातो, मागे सगळा ग्रुप माना डोलवत डोलवत ताल धरत गातो.
सध्या या गाण्याची अशी काही क्रेझ आहे की राजकारण ते समाजकारण या साऱ्यात त्याच्यावरून कोट्या सुरू झाल्या. बोलता बोलता कट्टेकरी एकमेकांना म्हणू लागले.. सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?आणि या प्रश्नापासून सुरू होणारा ‘गोल-गोल’ प्रवास सध्या अशी काही व्हायरल वावटळ घेऊन आलाय, की आपल्यालाही वाटतं की हे गाणं म्हणून पाहावं. विचारावंच कुणाला तरी, सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही काय?ही गंमत अनुभवायची असेल तर यूट्यूबवर जा, आणि पहा तमाम व्हिडीओ, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय?