सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता बीएसएनएलने एक पाऊल पुढे टाकले असून, व्हॉटस् अॅप, फेसबुक, ट्विटर, व्हिडीओ कॉलिंगची सुविधा लवकरच बीएसएनएल लॅँडलाईन फोनवर उपलब्ध होणार आहे. यासाठी मात्र ग्राहकांकडे बीसएनएल लँडलाईन कनेक्शन असणे आवश्यक असेल. विशेष म्हणजे ग्राहकांना अँड्रॉइड किंवा विंडोज स्मार्टफोनवर अवलंबून राहावे लागणार नाही.
बीएसएनएलच्या या लँडलाईन फिचरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक मोठी टच स्क्रीन असेल. ब्रॉडबँड मोडेम इनबिल्ट असेल, ज्यासाठी वेगळे मोडेम खरेदी करण्याची गरज नाही. यासोबतच आयपी लँडलाईन फोनमध्ये सॅनट्रॅक्सचा लाभ घेता येईल.
बीएसएनएल आपल्या शहरभरातील सर्व टेलिफोन एक्सचेंजला एनजीएनशी (नेक्सट जनरेशन नेटवर्किंग) जोडत आहे. यानंतर आतापर्यंत अॅनलॉग असलेले तुमचे कॉल्स आयपी बेस्ड होतील. यानंतर तुम्हाला फक्त आयपी लँडलाईन फोन घ्यावा लागेल. हा आयपी लँडलाईन फोन कुठल्याही स्मार्टफोनपेक्षा कमी नसेल. या फोनला लागलेल्या मोठ्या टचस्क्रीनच्या मदतीने तुम्हाला व्हॉटस् अॅप, फेसबुक, ट्विटर, व्हिडीओ कॉल, व्हाईस चॅट यांचा आनंद घरच्या घरी घेता येईल.
आतापर्यंत ग्राहक केवळ बीएसएनएल अॅनलॉग (वॉइस कॉल व मॅसेज) कॉल करु शकत होते. आता मात्र कॉल व मॅसेजसोबतच व्हॉटस् अॅप, फेसबुक, ट्विटर, व्हिडीओ कॉलिंगसाठी यासारख्या सुविधा देखील उपलब्ध होतील.