फेब्रुवारी महिना संपल्यावर उन्हाळ्याची चाहूल लागते. एप्रिल संपता-संपता बऱ्यापैकी ऊन लागायला सुरुवात होते, पण या वर्षी तर उन्हाने कमालच केलीय. गेले दोन दिवस तापमान वाढून प्रचंड गरम होतेय. त्यामुळे गार हवा हवीहवीशी वाटू लागली आहे. दरवर्षी उन्हाळा आल्यावर कॉलेज कट्ट्यावर जसे पिकनिकचे बेत रंगतात, तशाच चर्चा उन्हाळ्यात कोणती फॅशन करायची यावरही रंगतात. सुट्टी आणि आंब्यांमुळे हवाहवासा वाटणारा हा उन्हाळा यंदा मात्र, घामाच्या धारांमुळे अगदी नकोसा वाटू लागला आहे. म्हणून या सिझनला कशा प्रकारचे कपडे घालायचे, हा प्रश्नही सतावतो आहे.सध्या बाजारात असंख्य प्रकारचे कपडे मिळतात. उत्साहात आपण खरेदी करतोही, पण या फॅशनेबल कपड्यांमुळे गरम होत असल्याने, मग ते ४ महिने कपाटबंद होतात. म्हणून मग या उन्हाळ्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा कपड्यांचा शोध सुरू होतो. आता खास उन्हाळ्यासाठी कपडे घ्यायचे म्हटल्यावर, ते हटके आणि फॅशनेबल असलेच पाहिजे. ते तसे नसतील, तर शॉपिंगला आणि आपल्या चॉइसला काय अर्थ राहणार...? त्यामुळेच या सॉलिड हॉट कंडिशनमध्येही फॅशनेबल शॉपिंगने जोर पकडला आहे. त्याच वेळी काहींनी तर आॅनलाइन शॉपिंगवर भर देताना, उन्हापासून तात्पुरता सुटका करून घेतली आहे.उन्हाळ्यात आॅल टाइम घालता येईल, असा प्रकार म्हणजे कॉटन. बारा महिने कॉटन चालत असले, तरी उन्हाळ्यात मात्र त्याचे महत्त्व जास्त वाटते. खादी कपड्यांचा वापरही खूप सुटसुटीत असतो. सॉफ्ट कॉटन असलेले रेयॉनचे कपडेही सध्या हिट आहेत, तसेच मऊ आणि जाळीदार विणेमुळे उन्हाळ्यात लिनलचे कपडेही उपयुक्त ठरतात. या सगळ्या प्रकारात मुलांसाठी शर्ट, टीशर्ट, ट्राउजर्स, थ्री फोर्थ पँट्स असे प्रकार मिळतात, तर मुलींसाठी कुर्ते, टॉप्स, वेस्टर्न आउटफिट, लेगिन, पलाझो ट्रेंडी स्टाईलमध्ये मिळतात.सध्या पॉप्युलर असलेल्या अनेक आॅनलाइन साइट्सनी समर कलेक्शन लाँच केले आहे. त्या कपड्यांचे पॅटर्न, कलर कॉम्बिनेशन हटके आहेत. त्यांच्या किमतीही कमी-जास्त होत असल्याने, आपल्याला हव्या त्या बजेटमध्ये हे कपडे मिळतात. त्यामुळे या उन्हाळ्यात आॅनलाइन शॉपिंगचा विचार नक्की करा आणि एन्जॉय करा हा उन्हाळा!या वर्षी उन्हाळ्यात पांढºया रंगाचे कपडे ट्रेंडी असणार आहेत. यात अगदी कुर्ते, शर्ट यांच्यापासून चपलांपर्यंत सर्वच यंदा हिट आहे. तर उन्हाळ्याचा रंग म्हणून लव्हेंडर कलरला पसंती आहे, असे फॅशन एक्स्पर्ट श्रुती साठे यांनी सांगितले. सो या रंगाच्या स्टाईलिश कपड्यांसह हा उन्हाळा नक्कीच सुसह्य करता येईल.
उन्हाळ्यातील ‘कूल फॅशन’ ट्रेंड्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:53 AM