-डॉ. अपर्णा संथानम, त्वचारोगतज्ज्ञउन्हाळ्यात त्वचा काळवंडणे, घामोळे येणे, खाज सुटणे असे अनेक त्रास उद्भवू शकतात. यापासून बचाव करायचा असेल, तर उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्यायला हवी. छायाचित्रण, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारितेसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांत असणाऱ्या महिलांना कामासाठी सतत फिरावे लागते. त्यामुळे सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे मॉइश्चर कमी होते. त्यामुळे त्वचा काळवंडणे, प्रिमॅच्युअर एजिंग अशा समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा चेहरा, मान, पाठ, हात आणि पाय तीव्र सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्याने तिथली त्वचा काळवंडल्याचे आढळून येते. चप्पल घातल्यानंतर पायाचा जो भाग उघडा पडतो, तिथली त्वचा जास्त काळवंडते.त्यामुळे ऊन्हापासून संरक्षण करण्यासाठी फक्त एसपीएफ पुरेसे नाही. तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील किरणांपासून वाचविण्यासाठी ड्युएल स्पेक्ट्रम किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम सन प्रोटेक्शन लोशनचा वापर करा. बऱ्याच जणी सनप्रोटेक्शन लोशन फक्त चेहऱ्यावरच लावतात. मात्र, शरीराच्या ज्या इतर भागांवर सूर्यकिरणे पोहोचतात, अशा भागांची काळजी घेण्याचीही गरज असते, हे लक्षात घेतले पाहिजे. चेहऱ्याबरोबरच मान, पाठ, दंड, हाताच्या पाठचा भाग, पाय या अवयवांचेही सूर्यकिरणांपासून संरक्षण केले पाहिजे. घराबाहेर जाण्यापूर्वी १५-२० मिनिटे आधी त्वचेवर सारख्या प्रमाणात सनस्क्रीन लावले गेले, तर जास्त उपयुक्त ठरते. त्यामुळे त्वचा काळवंडत नाही. रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याबरोबरच कलिंगड, टोमॅटो, गाजर, काकडी असे पाण्याचा अंश जास्त असलेले पदार्थ खाल्ले गेले पाहिजेत. योगा आणि दीर्घ श्वसनामुळे मन शांत होते. रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे त्वचेवर एक तेज येते. दररोज पाच मिनिटे दीर्घ श्वसन केल्यामुळे त्वचा टवटवीत राहते.
उन्हाळ्यात घ्या त्वचेची विशेष काळजी
By admin | Published: April 06, 2017 2:26 AM