- नितांत महाजनपावसाळा जवळ आला की आपण सालाबादाप्रमाणे एक खरेदी नक्की करतो. पावसाळी बूट किंवा चपला. त्यातही रंगबिरंगी पावसाळी चपला तर सर्वत्र दिसतात. आता तर काय त्यात अनेक डिझाईन्स, फॅशन्स, रंग उपलब्ध असल्यानं पावसाळी रबरी चपला हा बोअर प्रकार वाटत नाही. पूर्वी फक्त काळ्या किंवा तांबड्या चपला उपलब्ध असत तसंही आता काही उरलेलं नाही. पण या रबरी चपला आपण जितक्या सहज घेतो, स्वस्तात स्वस्त. रोड साईड खरेदी करतो. स्वत:ला समजावतोही की, दोन-तीन महिने तर वापरायच्यात, कशाला खर्च करा? आणि मग त्या रबरी चपलांचे दोन-तीन जोडही घेणारे अनेकजण दिसतात. पण खरंच या चपला पायांसाठी बऱ्या आहेत? की या रबरी चपलांमुळे पायांना दुखापत होवू शकते?पण आपल्याकडे पावसाळ्यात बहुसंख्य लोक त्या रबरी चपलाच वापरतात. त्या चटकन धुता येतात. त्यांचे रंग बरे असतात. त्यामुळे काही हौशी पावसाळ्यात मॅचिंग चपलाही घालतात.माथ हफपोस्ट या वृत्तसंस्थेनं शिकागोच्या एका डॉक्टरांचा एक अभ्यास प्रसिद्ध केला आहे. हे डॉक्टर पोडियाट्रिस्ट आहेत. म्हणजे असे तज्ज्ञ डॉक्टर जे पायांच्या मुख्यत्वे पाऊलांच्या आजारांचे तज्ज्ञ आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, पावसाळ्यातच काय पण कधीही रबरी चपला वापरणं हे पायांसाठी घातकच आहे. या रबरी चपला पायांत घातल्यावर त्रासदायक वाटत नाहीत पण त्यांच्या हील्सना सपोर्ट नसतो, त्यामुळे टाचांना सपोर्ट मिळत नाहीत. आणि म्हणून स्लीपरने घसरण्याचा, पाय वेडावाकडा पडण्याचा आणि चालताना पावलाला त्रास होण्याचा जितका धोका असतो तितकाच या रबरी चपलांचाही असतो. आपल्याकडच्या पावसांत, रस्त्यावरच्या चिखलांत, आणि गाळाच्या राबडीत आपण या रबरी चपला घालून चालतो तेव्हा पायांनाच नाही तर आपल्यालाही धोका आहे हे लक्षात ठेवलेलं बरं.