दहा कोटी वर्षांपूर्वी डायनासोरचे युरोपातून स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2016 5:25 PM
एका नव्या अभ्यासानुसार, सुमारे 10 ते 12.5 कोटी वर्षांपूर्वी डायनासोर युरोप खंडातून दुसऱ्या खंडावर स्थलांतरित झाले.
एका नव्या अभ्यासानुसार, सुमारे 10 ते 12.5 कोटी वर्षांपूर्वी डायनासोर युरोप खंडातून दुसऱ्या खंडावर स्थलांतरित झाले. या संशोधनात ‘नेटवर्क थेअरी’चा वापर करून संपूर्ण जगभरात डायनासोरची स्थित्यंतरे दर्शविण्यात आली.सुपर कॉन्टिनेन्ट पॅनजियाच्या विखंडनानंतर संपूर्ण जगात डायनासोरचे स्थलांतर सुरू होते या निष्कर्षावर या संशोधनातून शिक्कामोर्तब झाले. लीड्स विद्यापीठातील प्रमुख संशोधक अॅलेक्स डनहील यांनी माहिती दिली की, पॅनजिया या विशाल खंडाचे तुकडे झाल्यानंतर महासागरांत जमिनीचे पूल तयार झाले. या पुलांच्या साहाय्याने डायनासोर संपूर्ण जगात विखुरले गेले. वरकरणी पाहता मादागास्कर ते आॅस्ट्रेलियापर्यंत समुद्रात पूल तयार होणे अशक्य वाटते; परंतु कोट्यवधी वर्षांच्या कालखंडात भूगर्भातील प्लेटच्या टेक्टोनिक क्रियाशिलतेमुळे असे पूल अस्तित्त्वात आले असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.यासंशोधनात पॅलिओबायोलॉजी डेटाबेस व जगभरातील डायनोसोर जीवाश्मांचा अभ्यास करण्यात आला. एकाच प्रजातीतील परंतु वेगवेगळ्या खंडांमध्ये सापडलेल्या डायनोसोर जीवाश्मांच्या नोंदींची विभिन्न कालखंडानुसार क्रॉसमॅपिंग केली असता डायनासोरनी स्थलांतर केल्याचे स्पष्ट झाले.