गाझियाबाद - गाझियाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुरक्षा रक्षकांच्या चौकटीत वावरणाऱ्या एडीएम रितु सुहास यांचा वेगळाच अंदाज सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्या मॉडेल बनून रॅम्पवर कॅटवॉक करत असून, सोशल मीडियावर लोक त्यांचं कौतुक करत आहेत. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी एडीएम रितू सुहास यांनी आग्रा येथे आयोजित फॅशन शोमध्ये सहभाग घेतला होता.
आग्रा येथे आयोजित कला, संस्कृती आणि हस्तशिल्प उत्सव असलेल्या ताज महोत्सवामध्ये फॅशन शोचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये मॉडेल्सनी खादी आणि भारतीय हस्तशिल्पाशी संबंधित कपडे घातले होते. याच शोमध्ये जेव्हा खादीच्या आकर्षक कपड्यांमध्ये एक मॅडेल जेव्हा रॅम्पवर आली तेव्हा तो चेहरा लोकांना ओळखीचा वाटला.
अखेर संचालकांना सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देत त्या मॉडेलची ओळख करून दिली. तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं. शो स्टॉपरच्या रूपात आलेली ही मॉडेल दुसरी तिसरी कुणी नाही तर गाझियाबादच्या एडीएम रितु सुहास होत्या. या फॅशन शोमधील त्यांचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. रितू सुहास यांनी सांगितले की, खादीला आम्ही प्रोत्साहन देणार नाही तर कोण देणार. उल्लेखनीय बाब म्हणजे या फॅशन शोचं आयोजन गाझियाबादच्या ए़़डीएम रितू सुहास यांनीच केलं होतं.
पीसीएस अधिकारी असलेल्या रितू सुहास यांनी २०१९ मध्ये मिसेस इंडियाचा पुरस्कार जिंकला होता. त्यांचे पती सुहास एल. वाय हे सध्या नोयडामध्ये जिल्हाधिकारी आहेत. ते भारताचे व्यावसायिक पॅर-बॅडमिंटन खेळाडू आहेत.