- सारिका पूरकर-गुजराथीलग्नसराई अजूनही सुरु आहे. त्यामुळे घरोघरी सुंदर,आकर्षक लग्नपत्रिका जमा झाल्याच असतील. हल्ली तर अनेकजण लग्नाचं आमंत्रणंही सोशल मीडियावरूनच देताय. पण असं असलं तरी कागदावर आकर्षक मजकूर, गणपती, ढोल-ताशे या सुंदर प्रतिकृतींचा समावेश करुन लग्नपत्रिका आजही छापून घेतल्या जातात. आता तर या छापिल लग्नपत्रिकांचंही रुपडं अधिक सुंदर झालं आहे. नवनवीन डिझाईन्स, वेगवेगळ्या पोताचे कागद यात वापरले जाताहेत. त्यामुळे या पत्रिका खूपच सुंदर दिसू लागल्याय. पण लग्नाची तिथी उलटली की या पत्रिकांचं काय करता तुम्ही? फेकून देता की रद्दीत देता? पण अनेकवेळेस पत्रिका जर खूपच सुंदर आणि आखीव रेखीव असल्या की त्या टाकून द्यायची इच्छा होत नाही. मग नकाच टाकून देऊ आता या पत्रिका. तर या पत्रिकांपासून तयार करा या काही सोप्या हटके गोष्टी. बूकमार्क्स लग्नपत्रिका नेहमीच पाकिटात घालून दिली जाते. या पाकिटाचा फ्लॅप हा कोरा असतो. हा फ्लॅप कापून घ्या. या कागदातून आयताकृती आकार (साधारण बूकमार्कच्या आकाराएवढा) कापून घ्या. फॅन्सी लूक हवा असेल तर आयताच्या चारही कडांवर तिरपे कट द्या. आयताच्या रुंदीच्या एका भागावर मध्यभागी छोटे भोक पाडून घ्या, यात कमी रूंदीची सॅॅटिन रिबन अडकवून टाका. या बूकमार्कवर तुम्ही एखादा छानसा संदेश, एखाद्या पुस्तकातील मोटिव्हेटिव्ह वाक्य, कवितेतील काही ओळी हातानं लिहू शकता. जेणेकरुन यास पर्सनल टच देता येईल. मुलांसाठी तुम्ही कार्टून, जोक्स, स्माईलीज काढू शकता, लिहू शकता. जर तुम्ही एखाद्याला पुस्तक भेट देणार असाल तर हे बूकमार्क त्या गिफ्टला आणखी पर्सनलाईज्ड टच देतं. आणखी एक बूकमार्कची लांबी ही पुस्तकाच्या लांबीपेक्षा किंचित जास्त असू द्या. यामुळे काय होईल, बूकमार्क पुस्तकात ठेवल्यानंतरही त्याचे एक टोक पुस्तकाबाहेर राहील आणि त्यामुळे तुम्ही सहज तुम्हाला हव्या त्या पानावर जाऊ शकाल. एरवी बूकमार्कची लांबी थोडी कमी असते आणि त्यामुळे तो थेट पुस्तकात जाऊन बसतो. त्यामुळे लवकर पान सापडत नाही.
गिफ्ट टॅग आपण एखाद्याला भेटवस्तू देतो तेव्हा ती आकर्षक गिफ्ट रॅपिंग पेपरमध्ये पॅॅक करुन आणि त्यावर बेस्ट कॉम्प्लिेमेंटचं स्टिकर लावून आणि त्यावर आपलं नाव टाकून देतो. हे तेच तेच स्टिकर लावण्याऐवजी काहीतरी हटके तुम्हाला करता येईल. त्याकरिता या पत्रिकांचा वापर करा. पत्रिकेच्या कागदातून ५ सेंमी बाय ५ सेंमी किंवा ५ बाय ७ सेंमी आकाराचे चौकोन, आयताकार कापून घ्या. त्याच्या कडांना गोलाकार, तिरपे छेद द्या. जेणेकरुन फॅन्सी लूक येईल. या तुकड्यांवर डाव्या बाजूला सोनेरी, कॉपर थ्री डी आऊटलाईनरनं सुंदर नक्षी रेखाटा. आणि बाजूला एखादा संदेश लिहा. यातून एकदम पर्सनलाईज्ड गिफ्ट टॅग तयार होतो.
फोटो फ्रेम जुन्या लग्नपत्रिकांमधून काही आकर्षक रंगांचे, डिझाईन्सचे कागद बाजूला काढून घ्या. तुमच्याकडील फोटोफ्रेमच्या कडांवर ते योग्यपद्धतीनं चिकटवून टाका. यामुळे फोटो फ्रेमला इको फ्रेंडली लूक येईल. लग्नपत्रिका जर जाडजूड, मोठ्या आकारातील असेल तर थेट त्यावरच तुमच्याकडील एखादा फोटो चिकटवा. आजूबाजूला रेडिमेड कृत्रिम फुलं-पानं लावून सजवा.