-मोहिनी घारपुरे- देशमुखपुरूषांच्या शर्टावरून गळ्याभोवती एक कापडाचा विशिष्ट आकारात रूळणारा कपडा, ज्याला आपण टाय म्हणतो, त्याची फॅशन तब्बल 17 व्या शतकापासून सुरू झाली. म्हणजे त्याचं झालं असं की एकदा फ्रान्सचा राजा किंग ल्युई तेरावा याने क्रोएशिअन सैनिकांना युद्धाकरीता पाचारण केले. त्यावेळी त्या सर्व सैनिकांनी आपल्या गळ्याभोवती एक कपडा विशिष्ट पध्दतीनं गुंडाळल्याचं दिसलं. हा कपडा म्हणजे त्यांच्या सैनिकी पोषाखाचाच एक भाग होता. त्या सैनिकांचा हा पोषाख राजाला भलताच आवडला आणि त्याने विशेषत: गळ्याभोवतीच्या त्या कापडाचा वापर आपल्याकडील सर्व रॉयल समारंभांचे प्रसंगी आवर्जून केला जावा असा फतवाच काढला. किंबहुना या सैनिकांच्या सन्मानार्थ त्याने या कपड्याला ‘ला क्राव्हेट’ असं फ्रेंच नावही दिलं.अर्थात, तेव्हाचे टाय आणि सध्या प्रचलित असलेले टाय यात पुष्कळ फरक आहे. जॅकेट्सला गळ्याभोवती बांधून ठेवण्याचे काम करण्याकरिता पूर्वी हे टाय वापरले जात. मात्र त्यानंतर संपूर्ण युरोपात तब्बल 200 वर्षांहून अधिक काळपर्यंत हे टाय फॅशन स्वरूपात कालपरत्त्वे पुढे येत गेले. तसेच त्यात टप्प्याटप्प्यानं बदलही होत गेले.विशेषत: कॉर्पोरेट कल्चरमध्ये पुरूषांबरोबरच स्त्रीयाही आता टाय वापरताना दिसतात. तसंच शाळांच्या गणवेशामध्येही टायचा समावेश आहे.
पुरूषांना भेट म्हणूनही टाय दिले जातात हे टायचे फॅशन जगातले यशच म्हणावे लागेल. टायपिन ही नवी अॅक्सेसरीही त्यानिमित्ताने बाजारात आली आणि लोकप्रियही झाली. आकर्षक पद्धतीनं टायची नॉट बांधता येणं ही तर महिलावर्गासाठी एक आव्हानात्मक, रोमांचक अशी कलाच आहे जणू.. कारण नव-याच्या गळ्यातला हार व्हायचं असेल तर त्याच्या गळ्यात ही टायची नॉट बांधण्याचं कसब यायला हवं अशीही एक खट्याळ, रोमहर्षक भावना महिलांमध्ये प्रचलित झाली. आणि जुन्या हिंदी -मराठी चित्रपटांनी तिला प्रोत्साहनही दिलं आहे.
1900 ते 1909 या दरम्यान टाय बांधण्याच्या रूढ पद्धतीबरोबरच अनेक नवे प्रकार उदयाला आले. शिवाय बो टाय आणि अस्कॉट्स टाय पद्धतीही प्रचलित झाली. यापैकी संध्याकाळच्या (व्हाइट टाय अटायर) कार्यक्रमांना विशेषकरून बो टाय आणि दिवसभराच्या फॉर्मल कार्यक्र मांना अस्कॉट्स (सरळ) टाय बांधण्याचा प्रघात इंग्लंडमध्ये सुरू झाला.
1910 - 1919 या कालखंडात खरंतर अलिकडे आपण वापरतो त्या पद्धतीचे टाय वापरले गेले. शिवाय पुरूषांच्या फॅशनमधला हा एक महत्त्वाचा घटक झाला.
1920 - 1929 या कालखंडात पुरूषांच्या टायकरीता हा एक अत्यंत महत्त्वाचा कालखंड ठरला. न्यूयॉर्कमधील टाय बनवणा-या जेसी लँग्सडॉर्फ यांना टाय बनवताना कापडाला एका निराळ्या आकारातून कापून तो बनवणे अधिक सहज आणि कल्पक ठरेल असा शोध लागला. यामुळे टायला एक निश्चित आकार प्राप्त तर झालाच तसेच त्याच्या विविध प्रकारच्या नॉट बांधल्यानंतरही पुन्हा तो पूर्व आकारात ठेवता येईल असे दोन्हीही हेतू साध्य झाले.
1930-1939 या दरम्यान टायच्या सध्या प्रचलित असलेल्या नॉटचा जन्म झाला. विंडसरच्या राजाने या पद्धतीने टायची नॉट बांधल्यावरून या नॉटला विंडसर नॉट असे नाव मिळाले आणि लोकांमध्येही तीच नॉट प्रचलित झाली.
1950 -1959 या दरम्यान स्किनी टाय उदयाला आले. तसेच टाय बनवणा-यानीही टायकरिता वेगवेगळे कापड वापरून पाहण्यास सुरूवात केली.
1960-1969 या कालावधीत किपर टायचा जन्म झाला. ब्रिटनमध्ये या प्रकारच्या फॅशनची जोरदार लाट आली. हे टाय तब्बल 6 इंचांपर्यंत रूंद होते.
1970- 1979 या कालखंडात बोलो टायचा जन्म झाला. हे टाय नंतर अरिझोनाचे अधिकृत स्टेट नेकवेअर म्हणून घोषित करण्यात आले. बोलो टाय म्हणजेच शूस्ट्रिंग नेकटाय.
1980-89 च्या दरम्यान टायच्या जीवनात फार काही घडामोडी झाल्याच नाहीत.
1990- 99 या दरम्यान फुलाफुलांच्या प्रिंट असलेले किंवा अन्य वेगवेगळ्या प्रिंट असलेले टाय फॅशनमध्ये आले.
2000 -09 टायची लांबी -रूंदी जुन्या काळाच्या तुलनेत कमी झाली.तसेच ते अधिक स्टायलिशही झाले.
2010 पासून आतापर्यंत टायच्या लांबीरूंदीत अनेक बदल झाले आहेत. वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या प्रिंट्स, वेगवेगळे कापड वापरून टाय तयार होतात आणि ते मोठ्या संख्येने वापरलेही जातात.