- अमृता कदम
प्रवासाची निमित्तं अनेक असतात. कधी आपण कामासाठी प्रवास करतो, कधी अभ्यासासाठी, कधी छंदापायी तर कधी केवळ मौजमजा म्हणून. प्रवासाच्या उद्देशानुसार आपल्या वॉर्डरोबपासून वागण्याबोलण्यापर्यंत सगळं काही बदलत असतं. पण कामानिमित्त फिरताना थोडी मौजमजा करता आली तर? सध्या बिझनेस ट्रीपमध्येच स्वत:साठीही मोकळा वेळ काढण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यातूनच एक नवा शब्दही तयार झालायइ Bleisure’..business आणि leisureचं मिश्रण करु न बनलेला. ‘एक्सपेडिया ट्रॅव्हल’या वेब पोर्टलनं केलेल्या एका सर्वेक्षणानुसार 43 टक्के बिझनेस ट्रीप आता ‘ब्लेजर’ ट्रीप होत चालल्या आहेत. कारण कामामधून वेगळा ब्रेक शोधण्यापेक्षा कामानिमित्त केलेल्या प्रवासाकडेच ब्रेक म्हणून पाहता येऊ शकतं. कामातून येणारा थकवा, तणाव दूर करु न एक नवी ऊर्जा मिळवण्याच्या दृष्टीनं जर तुम्ही तुमची बिझनेस ट्रीप प्लॅन केली तर नक्कीच गडबडीतही स्वत:सोबत वेळ घालवता येईल आणि कामासोबतच निवांतपणाचाही अनुभव घेता येईल.
बिझनेस ट्रीप कशी प्लॅन कराल?
1. तुमच्या ट्रीपची सुरूवात किंवा शेवट वीकेण्डला येईल यादृष्टीनं तुम्ही नियोजन करु शकता. कारण बिझनेस ट्रीप या दोन दिवसांपेक्षा जास्त मोठ्या नसतात. अशावेळी या दोन दिवसांना जोडून दोन-तीन दिवस वेळ काढता येत असेल तर उत्तम. वीकेण्डनं तुमच्या प्रवासाची सुरूवात झाली तर पुढचे दिवस कामासाठी मिळतात. आणि कामानं सुरूवात केलीत, तर पुढचे दोन दिवस स्वत:साठी राखून ठेवता येतात.
2. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात तिथली संपूर्ण माहिती आधी घ्या. काम संपल्यानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी जाऊ शकता याचीही माहिती घ्या. कामासाठी बाहेर पडल्यामुळे तुम्हाला त्या शहरातली सगळीच आकर्षणं पाहता येणार नाहीत. त्यामुळे तुमच्या कामाच्या, रहायच्या ठिकाणापासून जवळ असतील अशी एकदोन स्थळं तरी तुम्हाला पाहता येतील. त्यादृष्टीनं नियोजन करा.
3. तुम्हाला काम आणि मजा यांचा संगम साधायचा असेल तर वेळेचा आणि पैशांचाही सदुपयोग कसा होईल, हे पाहणंही गरजेचं आहे. तुमच्या हातात असेल्या गॅजेट्सचा त्यासाठी उपयोग होऊ शकतो. अगदी एखाद्या बागेत झाडाखाली बसून तुमच्या लॅपटॉप किंवा टॅबवर काम करु शकता. आॅफिसचे क्युबिकल्स किंवा हॉटेलच्या एसी रु ममध्ये बसून काम करण्यापेक्षा काहीतरी वेगळं! बऱ्याचदा बिझनेस ट्रीप या स्पॉन्सर्ड असतात. पण त्यासोबत तुमची वैयक्तिक ट्रीप प्लॅन केली असेल तर होणाऱ्या खर्चाचा विचार करु न नियोजन करा.
4. ट्रीपमध्ये तुमच्या कामाचा ताण वाढूही शकतो. अशावेळी तुमच्या प्लॅनमध्ये थोडीशी लवचिकता आणा. आपल्याला शेवटच्या क्षणीही बेत बदलावा लागू शकेल याची मानसिक तयारीही असली म्हणजे आहे त्या वेळातही न कुरकुरता मस्त एन्जॉय करता येईल.
5. अगदी तुम्हाला जवळपासच्या पर्यटनस्थळांना भेटी द्यायला नाही मिळाल्या तरी हरकत नाही. एन्जॉय करण्याचा सोपा उपाय म्हणजे त्या शहरात मस्तपैकी फेरफटका मारायला बाहेर पडा. तिथलं जीवनमान, घरं, बाजारपेठा, लोकांचे व्यवहार पाहत-पाहतही तुमचा वेळ जाईल. तिथलं स्थानिक जेवण तर मस्टच! तुमच्या स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीनं तुमचा हा ‘सिटी वॉक’ प्लॅन करता येईल.
6. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपला मुख्य उद्देश हा काम आहे आणि बाकीची मजा त्याला जोडून आहे, याचं भान असू द्या. म्हणजे मौजमजा करताना काही बंधनही तुमच्याकडून आपसूकच पाळली जातील.