कार अपघातातून सही-सलामत वाचायचेय? मग असे शरीर हवे...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2016 4:49 PM
‘टीसीए’ने पूर्णपणे कार-अपघातरोधक मानव कसा असेल याचा आराखडा विकसित केला आहे.
ज्या वेगाने मोटरवाहनांचा विकास होतोय, तेवढ्याच प्रमाणात अपघातातदेखील वाढत आहेत. थोड्या वेळ्यासाठी जर आपण असा विचार करा की, कोणत्याही प्रकारच्या कार अपघातात आपल्याला काहीच झाले नाही पाहिजे. पण असे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ आहे. ‘आॅस्टेलियाज् ट्रान्सपोर्ट अॅक्सिडेंट कमिशन’ने (टीसीए) याच प्रश्नाचे उत्तर शोधून काढले आहे.एक ट्रॉमा सर्जन, अपघाततज्ज्ञ आणि एक आर्टिस्टचा सामावेश असलेल्या ‘टीसीए’ने पूर्णपणे कार-अपघातरोधक मानव कसा असेल याचा आराखडा विकसित केला आहे. त्यानुसार माणूस या फोटोसारखा दिसेल. त्याचे नामकरण त्यांनी ग्रॅहम असे केले आहे. मोनॅश विद्यापीठाच्या अपघात संशोधन केंद्रातील रस्ता सुरक्षा अभियंता व टीसीए सदस्य डेव्हिड लोगन यांनी माहिती दिली की, आपण ज्या वेगाने विकसित झालो आहोत त्यापेक्षा कितीतरी अधिक वेगाने कार तंत्रज्ञान उत्क्रांत झाले आहे. आपल्या शरीरात सामन्यत: होणाऱ्या कार अपघातांचा आघात सहन करण्याची क्षमता नसते. ती असण्यासाठी आपल्या शरीरात काय बदल अपेक्षित आहे याचा आम्ही अभ्यास केला त्यातून ‘ग्रॅहम’चे हे रूप समोर आले.सर्वप्रथम तर अपघातामध्ये ग्रॅहमच्या मेंदूला आघात पोहचण्यापासून रोखण्यासाठी फार मोठ्या आकाराची कवटी गरजेची आहे. आंतर्गोल व भरपूर चरबीयुक्त त्याच्या चेहऱ्याला इजा होण्याची शक्यता फार कमी आहे. पाठ व मणक्याला सुरक्षित करण्यात करण्यासाठी ग्रॅहमची मानच गायब केलेली आहे. शरीरावर जखमा न होण्यासाठी त्याची त्वचा जाडजूड आहे. तसेच बरगड्यांवर हवेच्या पोकळीचा जास्तीचा थर दिलेला आहे.बरं हे झालं कार मधून प्रवास करत असताना. पण पायी चालत असताना जर कार येऊन धडकली तर काय? तर त्यासाठी त्याच्या पायाच्या घोट्याखाली सांध्याचा एक जोड अधिक दिलेला आहे. तसेच त्याचा गुडघादेखील अधिक लवचिक आहे. आॅस्ट्रेलियातील ‘टोवर्ड झीरो’ या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत ‘ग्रॅहम’ची निर्मिती करण्यात आली आहे.