का मिळते पुरुषांपेक्षा महिलांच्या पोर्ट्रेटस्ना जास्त किंमत?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2016 6:49 PM
या प्रश्नाचे उत्तर सध्या कला अभ्यासक शोधत आहेत.
चित्रपट, जाहिराती किंवा टीव्हीवर कोणताही कार्यक्रम असो, त्यामध्ये मुली असल्याच पाहिजे असा जणू काही अलिखित नियम आहे. पेंटिंग्ससुद्धा याला अपवाद नाही. जगामध्ये पुरुषांच्या पोर्ट्रेट पेंटिंग्सपेक्षा महिलांच्या पोर्ट्रेटला अधिक किंमत मिळते. परंतु असे का? या प्रश्नाचे उत्तर सध्या कला अभ्यासक शोधत आहेत.याची सुरुवात झाली चित्रकार तमारा दी लेम्पिका यांच्या गिडो सॉमी पोर्ट्रेटच्या लिलावामुळे. सन १९२९ मध्ये लेम्पिका यांनी काढलेल्या या चित्राची ‘साऊथबायज् न्यूयॉर्क’मध्ये लवकरच लिलाव होणार आहे. या चित्राला ४ ते ६ मिलियन डॉलर्स (२६ ते ४० कोटी रु) एवढी किंमत मिळण्याची शक्यता आहे. आता ही किंमत जरी खूप मोठी वाटत असली तरी लेम्पिकाच्या इतर पेंटिंग्सच्या तुलनेत तोकडी आहे.त्यांनी रंगवलेल्या चित्रांची विक्री विक्रमी १५ ते २० मिलियन डॉलर्समध्ये (१०० ते १३३ कोटी रु.) झालेली आहे. एवढा फरक असण्याचे कारण काय असू शकते याचा अभ्यास करत असताना तज्ज्ञांनी विचार मांडला की, पुरुषांच्या पोर्ट्रेटला कलाविश्वात तुलनेने कमीच किंमत मिळते. त्याच ठिकाणी महिलांच्या पोर्ट्रेटला प्रचंड मागणी असल्यामुळे त्यांची किंमतही खूप जास्त असते. तसेच, पुरुषांच्या पोर्ट्रेटची संख्यासुद्धा तुलनेने कमी असल्यामुळे त्यांची बाजारपेठही कमी आहे. त्यांच्या किंमतीचा पाठपुरावा करण्यासाठी ठोस असे उदाहरण नसल्यामुळे त्यांना उच्च किंमतीमध्ये विकणे अवघड असते. हेच कारण आहे की, लेम्पिकाच्या ‘ गिडो सॉमी पोर्ट्रेट’ला कमी किंमत अपेक्षित आहे. गिडो हा लेम्पिकाचा प्रियकर होता.