‘हे’ असणार मंगळावर जाण्यासाठी सर्वात मोठे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2016 4:00 PM
दीर्घकाळासाठी अवकाशात प्रवास करताना ‘नीरसता’ म्हणजे बोरडम ही सर्वात मोठी अडचण ठरते.
लवकरच मानवाचे मंगळावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पूर्ण होईल यात काही शंका नाही. त्यादृष्टीने वैज्ञानिकांची जोरदार तयारीदेखील सुरू आहे. नुकतेच नासाने मंगळ ग्रहावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या दीर्घकाळ अवकाश प्रवासादरम्यान अंतराळवीरांचा मानसशासशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी एक विशेष प्रयोग केला. त्यातून दिसून आले की, दीर्घकाळासाठी अवकाशात प्रवास करताना ‘नीरसता’ म्हणजे बोरडम ही सर्वात मोठी अडचण ठरते.‘नासा’ने तीन पुरुष आणि तीन महिलांचा सामावेश असलेल्या एका गटाला हवाई येथे मौना लोआ ज्वालामुखीच्या उतारावर एक वर्षासाठी जगापासून दूर एका डोममध्ये ठेवले. पूर्णपणे एकांतात हे सहा जण या ३६ फूट व्यास आणि २० फूट उंच डोममध्ये राहिले. फार क्वचित आणि स्पेससुट घालूनच हे सहा जण बाहेर पडत असत. संपूर्ण वर्षभर ताज्या भाज्यांशिवाय त्यांना राहावे लागले.प्रयोगात सहभागी झालेले अॅस्ट्रोबायोलॉजिस्ट सायप्रिन वरस्युएक्सने सांगितले की, या संपूर्ण काळामध्ये वाटणारी नीरसता, कंटाळा, बोरडमचे आमच्यापुढे सर्वात मोठे आव्हान होते. एका मर्यादित जागेत दीर्घकाळासाठी ठराविक लोकांबरोबच राहणे काही वेळा असहाय्य होते. त्यामुळे भविष्यात मंगळावर स्वारी करणाऱ्या अंतराळवीरांना आपला कंटाळा घालवण्यासाठी सोबत भरपूर पुस्तके न्यावी लागतील.