- मोहिनी घारपुरे-देशमुख
लग्नसमारंभात नवऱ्यामुलीसोबत तिच्या मैत्रिणी, बहिणी आपली नटण्यामुरडण्याची हौस भागवत असतात. फॅशनमध्ये जे जे इन असतं ते करून बघण्याची सगळ्याजणींनाच इच्छा असते. सध्याच्या लग्नातल्या फॅशनबद्दल सांगायचं तर लेहेंगा फॅशनची खूपच चलती आहे. खरंतर लेहेंग्याची फॅशन ही काही आजची नाही गेल्या कित्येक वर्षांपासून लग्नातल्या पेहेरावासाठी लेहेंग्याला महत्त्व दिलं जातं. पण या लेहेंग्याच्या फॅशनमध्येही बरेच अपडेशन होत आहेत. त्यातलंच अपडेशन म्हणजे लेहेंगा सारी. लेहेंगाचोली, घागराचोली पाठोपाठ अलिकडे लेहेंगा सारीनंही आपलं खास स्थान बाजारपेठेत निर्माण केलं आहे.
फॅशनेबल, मॉडर्न राहाणाऱ्या तरूणी लग्नसमारंभात जरीकाठाची साडी, शालू, पैठणी नेसण्यापेक्षा लेहेंगा सारीचीच हमखास निवड करतात. नेटचे पल्लू आणि एम्ब्रॉयडरी असलेला लेहेंगा असे या सारीचे विशेष सांगता येतील. बाजारात लेहेंगासारीचे कित्येक प्रकार आहेत. सारीच्या आणि पल्लूच्या रंगांमध्ये भरपूर कॉम्बीनेशनचे प्रयोग केलेले असतात.
साधारणत: डार्क रंगाचा लेहेंगा चोली आणि काँट्रास्ट कलरचा पल्लू असं काँबिनेशन या प्रकारच्या साड्यांमध्ये दिसतं. भरपूर हॅण्डवर्क असलेल्या चोली अशा साड्यांवर परिधान केल्यास रिच लुक येतो. आॅफ शोल्डर, थ्रीफोर्थ किंवा फुल स्लीव्ह्ज अशा कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थित फिटींगच्या चोली या साड्यांवर फारच खुलतात. अशा या लेहेंगा सारीजची किंमत तीनसाडेतीन हजारांपासून ते थेट पंधरा ते पंचवीस हजारांपर्यंत असू शकते. वेगवेगळ्या रेंजमध्ये या लेहेंगासारीज सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. लेहेंगासारीजची फॅशन करताना फॅशनचा सेन्सही जपावा लागतो. लहेंगासारीज रिच असतात पण त्या आपण घातल्यावर रिच दिसण्यासाठी काही गोष्टी मुद्दाम कराव्या लागतात.
लहेंगा सारी घालताना
* लेहेंगा सारीजमध्ये कलर कॉम्बिनेशन आणि एम्ब्रॉयडरी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्याची निवड योग्य ती केली नाही तर एकदम शॅबी लुक येऊ शकतो.
* चोलीचं फिटींग बरोबर नसेल तर आॅकवर्ड सिच्युएशन्सला सामोरं जावं लागतं. स्टिच केलेल्या चोलीजची ट्रायल समारंभापूर्वी करून पाहा.
* लहेंगा सारी निवडताना आपल्या फिगरचाही विचार करावा लागतो. फिगरनुसारही लहेंगा सारी (कमी जास्त वर्कची) निवडावी लागते. तुमची फिगर या साड्यांमध्ये अगदी स्पष्ट दिसते.
* लहेंगा सारीजवर हाय हिल्स वगैरे अजिबात घालू नका, लेहेंगा सारीजच्या खाली पायात ट्रॅडिशनल वेअरच घाला. स्टोन लावलेल्या चप्पल्स यावर छान दिसतात.