- मयूर पठाडेभारत हा जगातला सर्वात जास्त सौर ऊर्जा मिळणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतात इतके दिवस सूर्यप्रकाश असलेला पाहून आजही अनेक देशांना त्याविषयी हेवा वाटतो, पण इतका सूर्यप्रकाश असूनही आपल्या देशात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारे आजारही मोठ्या प्रमाणावर आहेत ही एक वस्तुस्थिती आहे. सूर्यप्रकाशातून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळतं. त्यामुळे अनेकांना सकाळच्या कोवळ्या उन्हात बसण्याचाही सल्ला दिला जातो. मात्र त्यापेक्षा अनेक जण सोपा उपाय म्हणून व्हिटॅमिन डीच्या गोळ्या खाणं पसंत करतात. व्हिटॅमिन डी आणि सर्दी यांचं नातंही खूप जवळचं आहे. सर्दीवरचा उपाय म्हणून अनेकदा, विशेषत: लहान मुलांना व्हिटॅमिन डीचा, त्यातही हाय डोसचा उपाय केला जातो.मात्र नुकत्याच झालेल्या संशोधनात शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे की, व्हिटॅमिन डीचा हेवी डोस दिला म्हणून तुमची सर्दी जाईलच, कमी होईलच असं काही नाही.
त्यासाठी त्यांनी चक्क एक प्रयोगच केला. एक ते पाच वयोगटातील मुलांचे त्यांनी दोन गट केले. एका गटाला व्हिटॅमिन डीची रेग्युलर म्हणजे कमी मात्रा दिली आणि दुसऱ्या गटाला जास्त मात्रा दिली. त्यानंतर दोन्ही गटावर त्याचे होणारे निष्कर्ष त्यांनी तपासले. व्हिटॅमिन डीचा हेवी डोस दिला, म्हणून त्याचा पटकन परिणाम झाला वगैरे असं काहीही त्यांना आढळून आलं नाही. दोन्ही डोसचा परिणाम सारखाच होता.शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं, आमच्यासाठी हा एक धडाच होता. जवळपास तीस वर्षांपासूनही अधिक काळ, आरोग्यक्षेत्रात सर्दी किंवा तत्सम आजारांसाठी व्हिटॅमिन डीचा उपयोग केला जातोय, खूप जास्त सर्दी असल्यास व्हिटॅमिन डीची मात्रा वाढवली जायची. पण या संशोधनात तसं काहीही आढळून आलं नाही.
सूर्यप्रकाशात असलेल्या डी जीवनसत्त्वामुळे त्याला ‘सनशाईन व्हिटॅमिन’ असंही म्हटलं जातं. शास्त्रज्ञांनी आपला सल्ला देताना म्हटलंय, शेवटी काहीही झालं तरी औषधं वगैरे गोष्टी म्हणजे दुय्यम उपाय आहेत, आपलं आरोग्य आपल्याला टिकवायचं असेल, तर आपली जीवनशैली सुधारणं, ती टिकवून ठेवणं हेच अधिक महत्त्वाचं आहे. त्यापुढेही शास्त्रज्ञांनी म्हटलंय, व्हिटॅमिन डीचा मारा करून आपण आपल्या युरिनची म्हणजे मुत्राची किंमत तेवढी वाढवतोय. कारण आपल्या शरीरातील सारी पोषक मुल्यं आपण मुत्रावाटे बाहेर टाकून देतो!