नवरात्रोत्सव म्हणजे, गरबा आलाच. तरूणांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत अनेक लोक मोठ्या उत्साहाने गरबा खेळताना दिसून येतात. घागरा, चनियाचोली यांसारख्या पारंपारिक पोषाख परिधान करून अनेक लोक गरबा खेळताना दिसतात. नवरात्रौत्सव सणामध्ये खास महिलांमध्ये एक विशिष्ठ प्रकारचा आनंद दिसून येतो. याच पार्श्वभुमीवर गुजरातमध्ये नवरात्रौत्सवावेळी खेळला जाणाऱ्या गरब्याला फार महत्व असते. तर गरबा राससाठी महिला पारंपरिक पद्धतीचे कपडे घालून गाण्यांच्या ठेक्यांवर गरबा खेळताना दिसून येतात. मात्र यंदाच्या नवरात्रौत्सवासाठी महिला अनोख्या पद्धतीचे टॅटू काढताना दिसून येत आहेत.
यावर्षी सुरत मधील तरुणींनीमध्ये एक वेगळाच ट्रेन्ड दिसून येत आहे. सगळ्या तरूणी पाठीवर टॅटू काढून संदेश देताना दिसत आहेत.
कोणी आपल्या पाठीवर जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्याचा टॅटू काढत आहेत. तर कोणी चांद्रयान 2 किंवा वाहतुकीचे नियम पाळण्याचा संदेश देत आहेत. सुरतच्या तरूणींनी काढलेल्या टॅटूचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
दरम्यान, देशभरात आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. अंबेमातेच्या नऊ रुपांची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. आज नवरात्रीचा पहिला दिवस असून देवीच्या नऊ रुपांपैकी एक शैलीपुत्री हिची आज पूजा केली जाणार आहे. शैलीपुत्री ही पर्वतराज हिमालय याची पुत्री असल्याचे मानले जाते.