पुणे : दिवाळी म्हटली की डोळ्यासमोर येतात ते नवनवे कपडे आणि दागिनेही. महागडे सोन्याचे दागिने घालून मिरवण्याची फॅशन केव्हाच मागे पडली असून सुरक्षिततेसाठी नकली किंवा एक ग्रॅमच्या दागिन्यांना स्त्रियांकडून पसंती दिली जात आहे. मागच्या वर्षी दागिन्यांमध्ये बाजीराव- मस्तानी चित्रपटाने भाव खाल्ला होता.यंदा मात्र दक्षिणेकडून महाराष्ट्रात नव्याने रूढ होऊ बघणाऱ्या 'टेम्पल ज्वेलरी'ची बाजारात हवा आहे. कमळ, देवी, देवता, नाण्यांवर कोरलेले देवाचे आकार मिळून ठसठशीत अशी टेंपल ज्वेलरी बनते. दक्षिणेत पारंपरिक दागिने म्हणून प्रसिद्ध असणारी टेम्पल ज्वेलरी यावर्षी आपल्याकडेही आवर्जून घेतली जात आहे. पारंपरिक दृष्टीने बघायचे झाल्यास ही ज्वेलरी लाल रंगाच्या सोन्यामध्ये केली जाते.मात्र आपल्याकडे लाल किंवा ऑक्सिडाईज दागिन्यांपेक्षा पिवळ्याधमक रंगाच्या दागिन्यांना मागणी आहे. त्यामुळे पिवळे टेम्पल दागिनेही बाजारात उपलब्ध आहेत. मूळ टेम्पल सेटमध्ये दोन लहान आणि मोठी गळ्यातली, कानातले झुबे किंवा झुमके, कानाचे वेल, बांगड्या, बाजूबंद, कंबरपट्टा, मस्तकपट्टी,वेणीच्यावरचा पट्टा, बिंदी, अंगठी अशा भरगच्च गोष्टींचा समावेश असतो.मात्र या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्याही मिळत असल्याने तुम्हाला हवे ते निवडण्याचा पर्याय आहेत.
कुंदनच्या दागिन्यांना मागणी ऐतिहासिक चित्रपट किंवा राजस्थानमध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्वेलरीत अधिक वापरण्यात आलेल्या कुंदन वापरून केलेल्या दागिन्यांनाही चांगली मागणी आहे. या दागिन्यांची किंमत साधारण १५० रुपयांपासून तर १० हजारपर्यँत आहे. एखाद्या साडी किंवा ड्रेसवर मोठे कुंदनचे झुमके घातले तरी पुरेसे होत असल्याने एखादा तरी कुंदनचा सेट घेण्याकडे मुलींचा कल असतो.
चिंचपेटी, ठुशी, नथ आजही हिटकेवळ सिनेमाशी निगडीत नव्हे तर पारंपरिक दागिनेही यंदाच्या दिवाळीत हिट आहेत. विशेषतः चिंचपेटी, ठुशी, नथ यांना तरुणींकडून आवर्जून मागणी आहे. हे दागिने अगदी १०० रुपयांपासूनच्या रेंजमध्ये बाजारात उपलब्ध आहेत.