जॉन कोलासो, मुक्त पत्रकार
डिसेंबरमध्ये थंडीची दुलई सर्वत्र पसरत असतानाच ‘ग्लोरिया’, विश यू मेरी ख्रिसमस’, ‘बाळ जन्मले, विश्व आनंदले’, अशा ख्रिसमस गीतांचे, कॅरल सिंगिंगचे मंगल सूर कानी पडू लागतात आणि ख्रिसमससाठी कोणकोणती पक्वान्नं बनवायची याची खलबते जोरात सुरू होतात. अर्थातच, या चर्चेत पहिलं प्राधान्य केकला मिळते. केकशिवाय ख्रिसमस साजरा होऊच शकत नाही.
तर असा हा केक विकत आणायचा की घरीच बनवायचा? यावर खल होतो आणि तो घरीच बनविण्यावर एकमत होते, तोही खजूर-गाजराचा खुसखुशीत केकच हवा, अशी एकमुखी मागणी होते. गुलाबी गाजरं किसण्याचं काम तसं जिकिरीचं असतं, तरीही या किसलेल्या गाजरात खजूर घालून बनविण्यात येणारा केक पाहुण्यांना आणि घरच्या मंडळींना खूपच आवडतो. तो कितीही खाल्ला तरी समाधान होत नाही. अशा केकवर भरपूर ताव मारून झाल्यावरच ख्रिसमससाठी आलेले पाहुणे मग इतर पदार्थांवर वळतात.
अर्थातच खजूर आणि गाजराच्या केकसमवेत इतरही केक असतात. त्यामध्ये सुकामेवा घालून बनविण्यात आलेले वॉलनट केक, अंजीर केक, ड्रायफ्रूट मिक्स केक, बनाना केक, मार्बल केक, बटर मावा केक, कोकोनट केक, इत्यादींचा समावेश असतो. केकच्या सोबत कलकल, ट्रफल्स, विविध प्रकारची कुकीज असतात. करंज्या, शंकरपाळ्या यांनी आपले ख्रिसमसमधील पारंपरिक महत्त्व टिकवून ठेवले आहे. मात्र, पारंपरिक करंज्यांत विविध प्रकारांची भर पडली आहे.
गोड करंज्या आवडत नसतील तर मटार घातलेल्या करंज्याही ख्रिसमसच्या फराळात अग्रभागी असतात. करंज्यांच्या शेजारी शंकरपाळ्या, खजुराचे रोल ठाण मांडून टी-पॉयवर बसलेल्या असतात. कटलेटची चव तर आगळीच असते. त्यात बटाट्याचे कटलेट, मक्याचे कटलेट, बिटाचे कटलेट, कोबी फ्लॉवरचे कटलेट असे विविध प्रकारचे स्वादिष्ट कटलेट ख्रिसमसच्या फराळाची लज्जत वाढवितात.
भरपेट फराळासाठी अनेक जण वडेही बनवितात. तांदूळ, उडदाच्या पिठापासून बनविलेले छोटे मेदूवडे किंवा मैद्यापासून बनविण्यात येणारे गरमागरम गोल वडे, म्हणजेच गुळगुळे चटणीसोबत खाण्यात व नंतर चहाचे घुटके घेण्यात ख्रिसमसचा आनंद खरोखरच लुटता येतो. वडे करणे ज्यांना शक्य होत नाही, ते धिरडं किंवा पोळे बनवितात. तांदळाच्या पिठात व काही प्रमाणात गहू, ज्वारीचे पीठ मिसळून धिरडं बनविली जातात. घावण नावानेही ती ओळखली जातात.
खास बनविण्यात आलेला खमंग मलाई पनीर कोरमा, किंवा सोयाबिन सर्पोतेल वा इंद्यालूसमवेत हे पोळे खाण्यात एक आगळीच मजा असते. त्यानंतर बिर्याणीवर ताव मारता येतो. मटार व विविध प्रकारचा इतर भाजीपाला घालून व थर लावून, दमावर शिजवून बनविलेली बिर्याणी फारच लज्जतदार असते.
सध्या आंतरधर्मीय, आंतरजातीय व आंतरराष्ट्रीय लग्ने सर्रास होत असल्याने एकाच घरात वेगवेगळ्या धार्मिक वा सामाजिक संस्कारात वाढलेल्या सुना-जावई येत आहेत. या बदलाचे पडसाद सणासुदीच्या जेवणावळीवरही उमटतात. साहजिकच ख्रिसमसच्या सणात बनविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्वरूपही बदलत आहे. कोणी पोह्याच्या वड्या बनवितात तर कोणी कॉर्नफ्लॉवर, गाजर, वाटाणे घालून नूडल्सचे कटलेटही तयार करतात. ओट्सचे पॅनकेक्स, मोड आलेल्या मुगाची पेस्ट, तांदळाचे पीठ, हळद आणि टोमॅटो प्युरीपासून टॉमॅटो पुंगळू, दोडक्याचे अप्पम, कुळीथपासून बनविण्यात आलेले खाकरा असे काही नवीन खमंग पदार्थही ख्रिसमसच्या फराळात दिसू लागले आहेत.
लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक झालेल्या कुटुंबांची मुलं येथे ख्रिसमससाठी आली की, त्यांना ‘वडापावा’वर मनसोक्त ताव मारल्याशिवाय त्यांचा ख्रिसमस काही साजरा होत नाही.