'या मंत्राचा अर्थ काय?' जेव्हा आमिर खानने सहकलाकाराला विचारला होता गायत्री मंत्राचा अर्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 01:28 PM2022-06-14T13:28:39+5:302022-06-14T13:42:20+5:30
Aamir khan: जवळपास ६ महिने गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर या मंत्राचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अभिनेत्याने त्याच्या सहकलाकाराला विचारला होता.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (aamir khan) कायम त्याच्या दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जातो. वर्षाकाठी केवळ एक चित्रपट करणाऱ्या आमिरचे आतापर्यंत अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजले आहेत. त्यातलाच एक चित्रट म्हणजे लगान (lagaan). १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आज २१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाशी संबंधित अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यामध्येच आमिरचा एक किस्सा चर्चेत येत आहे. जवळपास ६ महिने गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर या मंत्राचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अभिनेत्याने त्याच्या सहकलाकाराला विचारला होता.
सध्या सोशल मीडियावर अभिनेता अखिलेंद्र मिश्रा याची एक मुलाखत चर्चेत येत आहे. अखिलेंद्र यांनी लगान चित्रपटात अर्जुन लोहार ही भूमिका साकारली होती. त्यामुळे या चित्रपटातील आमिरचा एक किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
"लगान चित्रपटाचं शूट सुरु असताना आमचा दिनक्रम कमालीचा होता. या शूटिंगसाठी दररोज सकाळी ६ वाजता आम्हाला बसमधून निघावं लागायचं. या बसमध्ये आमिर खानसह चित्रपटाची सगळी टीम असायची. मी पहिल्याच दिवशी बस निघण्यापूर्वी ड्रायव्हरला गायत्री मंत्राची सीडी दिली होती. त्यामुळे रोज सकाळी आम्ही हा मंत्र म्हणत प्रवास करायचो. हॉटेलपासून ते सेटवर पोहोचेपर्यंत हा जप सतत सुरु असायचा. विशेष म्हणजे हा मंत्र नित्यनियमाने ऐकायची सगळ्यांना सवय झाली होती. त्यामुळे तब्बल ६ महिने हा मंत्र आम्ही नियमितपणे ऐकला", असं अखिलेंद्र म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "लगानचं चित्रीकरण जानेवारीमध्ये सुरु झालं होतं आणि जूनमध्ये संपलं. या सहा महिन्यात ऋतू बदलले पण मंत्राचा जप कायम राहिला. विशेष म्हणजे हा मंत्र सुरु असताना एकदा मला आमिरने मला या मंत्राचा अर्थ विचारला. या मंत्राचा नेमका अर्थ काय आहे? असं आमिरने विचारलं. त्याच्या या प्रश्नावर मी त्याला अर्थ समजावून सांगितला. त्यानंतर अर्थ समजल्यावर तो आणखीनच उत्साहाने हा मंत्र ऐकू लागला."
दरम्यान, लगान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. उत्तम कथानक आणि कलाकारांचा दर्जेदार अभिनय यांमुळे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितदेखील करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकरने केलं आहे.