‘पठाण’मुळे २५ थिएटर्सना मिळणार संजीवनी; बंद झालेली सिनेमागृहे चित्रपट प्रदर्शनासाठी पुन्हा उघडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:25 AM2023-01-24T07:25:27+5:302023-01-24T07:25:49+5:30
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनित ‘पठाण’ चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीतील वातावरण चांगलेच तापवले आहे.
मुंबई :
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनित ‘पठाण’ चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीतील वातावरण चांगलेच तापवले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी रिलीज होणाऱ्या ‘पठाण’ने एकीकडे सव्वातीन लाखांच्या आसपास ॲडव्हान्स बुकिंग मिळवले आहे, तर दुसरीकडे विविध कारणांमुळे बंद झालेल्या देशभरातील २५ सिनेमागृहांचे दरवाजे प्रेक्षकांसाठी उघडले आहेत.
कोरोनानंतर अद्यापही देशभरातील बरीच चित्रपटगृहे विविध कारणांमुळे सुरू झालेली नाहीत. यापैकी २५ चित्रपटगृहांच्या दरवाजावरील कुलुपे ‘पठाण’च्या आगमनासोबत खुली होणार आहेत. हिंदीसह तमिळ आणि तेलुगूमध्येही रिलीज होणाऱ्या ‘पठाण’चा मुहूर्त साधत देशातील विविध राज्यांमधील २५ सिनेमागृहे रिओपन होणार ही सिनेप्रेमींसाठी खूशखबर आहे. चार वर्षांनी शाहरुख रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार असल्याने प्रोडक्शन हाऊसपासून डिस्ट्रीब्युटर्सपर्यंत सर्वांनीच आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. एकाच मुहूर्तावर देशातील २५ सिनेमागृहे पुन्हा सुरू करण्यासाठी शाहरुखच्या टीममधील प्रत्येक घटकाने खूप मेहनत घेतली असून, सिनेमागृहांच्या मालकांचीही त्यांना साथ लाभल्याने हे शक्य झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
पुन्हा नव्याने रसिकांच्या सेवेत दाखल होणाऱ्या चित्रपटगृहांमध्ये महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी २, गोवा, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी १, उत्तर प्रदेशमधील ११, राजस्थानमधील ७ चित्रपटगृहांचा समावेश आहे.