ऋषी कपूर व मिनाक्षी शेषाद्रीच्या ‘दामिनी’ला 28 वर्षे पूर्ण, रंजक आहे ‘चिंटू’च्या कास्टिंगचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 02:06 PM2021-04-30T14:06:08+5:302021-04-30T14:06:43+5:30
हा विचित्र योगायोग की नियतीचा खेळ! होय, गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता आणि 28 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांचा ‘दामिनी’ हा सुपरहिट सिनेमा रिलीज झाला होता.
हा विचित्र योगायोग म्हणायचा की, नियतीचा खेळ. होय, गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 30 एप्रिलला अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी जगाचा निरोप घेतला होता आणि 28 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांचा एक सुपरहिट सिनेमा रिलीज झाला होता. या चित्रपटाचे नाव आहे, दामिनी. 30 एप्रिल 1993 साली ‘दामिनी’ (Damini) चित्रपटगृहांत झळकला होता.
राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. या चित्रपटात ऋषी कपूर यांच्या अपोझिट मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) झळकली होती. तर सोबत सनी देओल, अमरीश पुरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.
‘दामिनी’ या सिनेमात ऋषी यांनी शेखर गुप्ताची भूमिका साकारली होती़. न्यायासाठी अख्ख्या समाजाविरोधात लढणा-या महिलेची ही कथा व हा सिनेमा बॉलिवूडच्या बेस्ट वूमन सेंट्रिक चित्रपटात गणल्या जातो. ‘दामिनी’त ऋषी कपूर व मिनाक्षी शेषाद्री यांनी भूमिका केल्या. पण या चित्रपटामुळे खरी लोकप्रियता मिळाली ती सनी देओल याला. त्याचा या चित्रपटातील ‘तारीख पे तारीख’ हा डायलॉग तर इतका गाजला की, ‘दामिनी’ हा सनी देओलचाच सिनेमा ठरला.
ऋषी कपूर यांना कदाचित याबद्दलची खंत असावी. कारण एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी याबद्दलची खंत बोलून दाखवली होती.
‘दामिनी’ या चित्रपटात मी सर्वोत्तम काम केले होते. पण लोकांनी माझी प्रशंसा केली नाही. त्यांनी सनी देओलचे कौतुक केले. पण माझी भूमिका सोपी नव्हती. ती भूमिका पडद्यावर साकारणे अतिशय कठीण होते. तू नसतास तर माझ्या चित्रपटाचे काहीही झाले नसते, असे राजकुमार संतोषी मला आजही म्हणतात, असे ऋषी कपूर या चित्रपटाबद्दल म्हणाले होते.
आधी जॅकी श्रॉफ होते पहिली पसंत
फार कमी लोकांना ठाऊक असेल की, दामिनी या सिनेमातील ऋषी कपूर यांच्या वाट्याला आलेली भूमिका सर्वात आधी जॅकी श्रॉफ यांना आॅफर केली गेली होती. पण त्यांनी राजकुमार संतोषीसोबतच्या मतभेदांमुळे हा सिनेमा करण्यास नकार दिला होता. जॅकीने नकार दिल्यावर या सिनेमात ऋषी कपूर यांची वर्णी लागली.
डिंपल असेल तर मी नसेन...
सिनेमा सुरू होताच मीनाक्षी शेषाद्री व राज कुमार संतोषी यांच्यात कुठल्याशा कारणावरून मतभेद निर्माण झाले होते. यामुळे संतोषी यांनी मिनाक्षीच्या जागी ऐनवेळी डिंपल कपाडियाला घेण्याचा निर्णय घेतला होता़. पण डिंपल असेल तर मी काम करणार नाही, असे ऋषी कपूर यांनी स्पष्ट केले. यामुळे नाईलाजाने संतोषींनी श्रीदेवींशी संपर्क केला. पण मानधनामुळे त्यांनीही नकार दिला. अखेर संतोषींना मिनाक्षीसोबतच हा सिनेमा बनवावा लागला.
तेव्हा सनी कुठेच नव्हता...
असे म्हणतात की, या सिनेमाची स्टोरी ऐकवली गेली तेव्हा सिनेमात केवळ तीन हिरो असतील, असे ऋषी कपूर यांना सांगण्यात आले होते. पण सनी देओलबद्दल ऋषी कपूर यांना सांगितलेच नव्हते. जेव्हा त्यांना हे कळले तेव्हा ते कमालीचे संतापले होते.