पाय मांडीपासून कापला आता हात...,‘3 इडियट्स’मधील मराठी अभिनेता जगतोय हलाखीचं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 10:27 AM2022-02-24T10:27:36+5:302022-02-24T10:31:37+5:30
3 Idiots : 3 इडियट्स या चित्रपटात बोमन इराणी यांचा पसर्नल असिस्टंट ‘गोविंद’चे पात्र ज्येष्ठ मराठी अभिनेते राजेंद्र पटवर्धन यांनी साकारले होते. हेच राजेंद्र पटवर्धन सध्या हलाखीचं आयुष्य जगत आहेत.
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याचा ‘3 इडियट्स’ (3 Idiots) हा सिनेमा आजही आवडीने पाहिला जातो. मनोरंजन आणि सामाजिक परिणाम साधणारा हा सिनेमा प्रचंड गाजला. आमिरने साकारलेला रॅन्चो म्हणजे अफलातून. आजही फरहान, राजू, रंछोडदास चांचड ही सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. आमिरसोबत बोमन इराणी शर्मन जोशी, करीना कपूर खान, मोना सिंग आणि आर माधवन, ओमी वैद्य अशा अनेकांच्या भूमिकांनी सजलेला या सिनेमाची क्रेझ अद्यापही कायम आहे. याच चित्रपटात बोमन इराणी यांचा पसर्नल असिस्टंट गोविंदचे एक पात्र होते. ज्येष्ठ मराठी अभिनेते राजेंद्र पटवर्धन (Rajendra Patwardhan) यांनी ही भूमिका साकारली होती. हेच राजेंद्र पटवर्धन सध्या हलाखीचं आयुष्य जगत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी आहेत. आता त्यांनी चाहत्यांकडे मदतीची याचना केली आहे.
‘3 इडियट्स’ सिनेमानंतर राजेंद्र पटवर्धन फार काही प्रोजेक्टमध्ये दिसले नाहीत. याचे कारण त्यांची प्रकृती. ‘मराठी नाट्य कलाकार संघ’ या फेसबुक ग्रुपवर गेल्या आठवड्यापासून एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांच्या आजारपणाबद्दल माहिती देण्यात आली आहे. शिवाय या पोस्टद्वारे त्यांच्या मदतीचे आवाहनही करण्यात आले आहे.
काय आहे पोस्ट?
मला काही बोलायचे आहे, सांगायचे आहे...मी एक साधा माणूस. व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटक केलेला पण मी सेलिब्रिटी नाही. मी एक नट, उत्तम संस्थेत काम केलेले आहे.. उदा. विनय(सर) आपटे बाकी मी काही बोलणार नाही...कारण आज माझा दिवस नाही. याचे कारण आमचा एक मित्र राजू पटवर्धन (राजू पटवर्धन माझ्याबरोबर अपराध मीच केला या नाटकात होते.) असो! आत्ता ते खूप आजारी आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचा एक पाय मांडीपासून कापला गेला आहे...आता त्याचा उजवा हात देखील निकामा झाला आहे. हा आता भरारी अपंगालयात आहे, तो एकटा, अविवाहित आहे . वय साठीच्यापेक्षा जास्त. मी व माझा मित्र प्रसिध्द दिग्दर्शक,लेखक, निर्माता अमोल भावे आम्ही त्याच्यासाठी पैसे गोळा करत आहोत. हे अपंगालय म्हणजे. भरारी अपंगालय...मानपाडा गाव, उंबरली रोड, साई धारा टॉवर्स, डोंबिवली पूर्व इथे आहे.
गरज आहे ती आर्थिक मदतीची...आत्तापर्यंत मी, अमोल भावे, संध्या म्हात्रे, प्रसन्ना आठवले, दीपक परुळेकर, शेखर जोशी, संध्या दानव, काका हरदास व इतर अनेक मदत करत आहेतच आपणही करावी..फार नाही किमान शंभर पाचशे हजार जास्त नको! राजू पटवर्धन यांनी शेवटची भूमिका हिंदी चित्रपट थ्री इडियट्स व मराठीमध्ये भिकारी आणि टपाल यात केली होती.ज्यांना कुणाला मदत करायची असेल त्यांनी मला कळवा.त्यांचे डिटेल्स मी त्यांना देईन.माझा नंबर 9892122214. खाली कमेंट्स मधे मी त्यांचा नंबर व बँक खात्याचे डिटेल्स देत आहे. गुगल पे नाही..असं म्हणतं मदतीचे आवाहन करण्यात आलं आहे.