36 Years of Sadma : - तर ‘सदमा’मध्ये श्रीदेवी नाही तर असती ‘ही’ अभिनेत्री!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 01:36 PM2019-07-08T13:36:36+5:302019-07-08T13:38:20+5:30
कमल हासन आणि श्रीदेवी यांचा ‘सदमा’ हा आयकॉनिक सिनेमा कुठलाच सिनेप्रेमी विसरू शकत नाही. 8 जुलै 1983 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सदमा’ या चित्रपटाला आज 36 वर्षे पूर्ण झालीत.
कमल हासन आणि श्रीदेवी यांचा ‘सदमा’ हा आयकॉनिक सिनेमा कुठलाच सिनेप्रेमी विसरू शकत नाही. 8 जुलै 1983 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सदमा’ या चित्रपटाला आज 36 वर्षे पूर्ण झालीत. ‘मूंदरम पिरई’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या या चित्रपटातील कमल हासन व श्रीदेवी यांच्या अभिनयाची जुगलबंदी इतकी अफलातून होती की, आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात आहे. यातील ऐ जिंदगी, सुरमई अखियों में ही अजरामर गाणी तर आजही मनाचा ठाव घेतात. तीन फिल्म फेअर पुरस्कार पटकावणारा हा सिनेमा श्रीदेवी व कमल हासन यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. पण श्रीदेवीआधी हा चित्रपट दुस-याच एका अभिनेत्रीला ऑफर झाला होता, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.
होय, श्रीदेवी आधी हा चित्रपट अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांना ऑफर झाला होता. डिम्पल यांनी काही कारणास्तव या चित्रपटाला नकार दिला आणि अखेर श्रीदेवींना या चित्रपटासाठी निवडण्यात आले.
या चित्रपटात साऊथची अॅडल्ट स्टार सिल्क स्मिताही दिसली होती. 1983 मध्ये ‘सदमा’ रिलीज झाला तेव्हा सिल्क टॉपची अभिनेत्री होती. केवळ 4 वर्षांत 200 चित्रपट तिच्या नावावर होते.
‘सदमा’ पाहिल्यानंतर श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर अनेकदिवस आपल्या आईशी बोलली नव्हती. एका मुलाखतीत श्रीदेवींनी हा किस्सा ऐकवला होता. ‘सहा वर्षांची असताना जान्हवीने माझा ‘सदमा’ हा चित्रपट पाहिला आणि तो पाहिल्यानंतर पुढचे तीन दिवस तिने माझ्याशी अबोला धरला होता. तू खूप वाईट आई आहेस, त्याच्याशी (चित्रपटातील सोमूशी) तू खूप स्वार्थीपणे वागलीस. तू शेवटी त्याला सोडून दिलेस, असे ती मला म्हणाली होती, ’असे श्रीदेवींनी सांगितले होते.