66th National Film Awards 2019: पुरस्कार मिळाल्यानंतर विकी कौशल, आयुषमान खुराणा, अक्षय कुमारने दिल्या या प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2019 07:22 PM2019-08-09T19:22:30+5:302019-08-09T19:48:28+5:30
‘अंधाधुन’चा अभिनेता आयुषमान खुराणा आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा विकी कौशल या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
संपूर्ण भारतीय कलाविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत मानाच्या 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित ‘भोंगा’ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे तर आयुषमान खुराणा, तब्बू आणि राधिका आपटे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘अंधाधुन’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा बहुमान मिळवला आहे.
हिंदी चित्रपटांमध्ये ‘अंधाधुन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘अंधाधुन’चा अभिनेता आयुषमान खुराणा आणि ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा विकी कौशल या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’साठी दिग्दर्शक आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘पॅडमॅन’ हा अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘बधाई हो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर विकीने सांगितले, मला पुरस्कार दिल्याबद्दल मी ज्यूरींचे आभार मानतो. हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास असून हा मी आयुषमान खुराणासारख्या एका चांगल्या अभिनेत्यासोबत शेअर करतोय याचा मला आनंद होत आहे. आयुषमान केवळ एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर व्यक्ती म्हणून देखील खूप चांगला आहे. हा पुरस्कार मी उरी या चित्रपटाच्या टीममधील प्रत्येकाला, माझ्या आईवडिलांना आणि भारतीय जवानांना समर्पित करतो.
तर आयुषमानने आनंद व्यक्त करत सांगितले, माझ्या बधाई हो आणि अंधाधुन या दोन्ही चित्रपटांना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमुळे मी खूश आहे. लोकांचे मनोरंजन करणारे चित्रपट लोकांना आवडतात असेच म्हणावे लागेल.
पॅडमॅनला मिळालेल्या पुरस्कारानंतर अक्षयने त्याच्या पत्नीचे अभिनंदन केले. त्याने सांगितले की, मी मिशन मंगल या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना मला टीनाने (ट्विंकल खन्ना) ही बातमी सांगितली. ही बातमी ऐकताच क्षणात माझा थकवा दूर झाला. पॅडमॅनचे चित्रीकरण करत असतानाच मला आणि सोनमला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल कळले होते. टीनाची निर्मिती असलेल्या पहिल्याच चित्रपटासाठी तिला पुरस्कार मिळाला... त्यासाठी मी तिचे, आर. बाल्की आणि पॅडमॅन चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. त्याचसोबत मी दिग्दर्शित केलेल्या चुंबक या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी स्वानंद किरकिरेला साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे हा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे असेच मला म्हणावे लागेल.