69th National Film Awards: आलिया भट अन् क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 04:31 PM2023-10-17T16:31:18+5:302023-10-17T16:32:44+5:30
आज १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आज १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. गेल्या महिन्यात विजेत्यांची घोषणा करण्यात आली होती. आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बॉलिवूड, साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री मधून अनेक दिग्गज सहभागी झाले. सर्वोत्कृष्ट अभिनेता अल्लू अर्जुन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट आणि क्रिती सेनन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आलिया भटला 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी तिचा पती रणबीर कपूर तिच्यासोबत उपस्थित होता. आलियाला पुरस्कार घेत असताना पाहून रणबीरने हे क्षण कौतुकाने कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. तर दुसरीकडे क्रिती सेननलाही 'मिमी' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
संजय लीला भन्साळींच्या सिनेमात पहिल्यांदाच आलियाने काम केले होते. तेही यात तिने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमिका साकारली जे आव्हानात्मक होते. मात्र आलियाने हे आव्हान लीलया पेलले आणि आज तिला तिच्या कष्टाचं फळ मिळालं.
तर क्रिती सेनने 'मिमी' या सिनेमात साकारलेली आई मनाला भावून जाणारी आहे. सरोगसीमध्ये ती दुसऱ्यांच्या मुलाला जन्म देते. ज्या जोडप्यासाठी ती मुलाला जन्म देणार असते ते जोडपं तिला गरोदर असतानाच सोडून जातं. मुलाच्या जन्मानंतर मिमीला त्याचा लळा लागतो आणि नंतर जेव्हा ते जोडपं परत येतं तेव्हा मात्र ती लेकाला दूर घेऊन जाण्यास नकार देते. अतिशय भावूक अशा या कहाणीत क्रितीने जीव ओतून काम केलं आहे. त्याचंच फळ तिला आज मिळालं आहे.