८ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृति संगीत समारोह; विठ्ठल उमप फाऊंडेशन मृदगंध पुरस्काराची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 08:44 PM2018-11-16T20:44:18+5:302018-11-16T20:45:03+5:30
अभिनेते विक्रम गोखले यांना जीवनगौरव आणि पद्मश्री डॉ. अभय बंग, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले,सौ. शकुंतला नगरकर, डॉ. निलेश साबळे,अमितराज यांना मृद्गंध पुरस्कार जाहीर
मुंबई - लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी स्मृति संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्काराचे भव्य आयोजन केले जाते. यंदाचे हे आठवे वर्ष असून हया वर्षीच्या पुरस्काराची घोषणा नुकतीच मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव गायक नंदेश उमप यांनी हया पुरस्कारांची माहिती दिली. यंदाचा लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते विक्रम गोखले यांना जाहीर करण्यात आला. तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पद्मश्री डॉ. अभय बंग, साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणारे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, लोककलेतील प्रसिद्ध सौ. शकुंतलाताई नगरकर, लेखन, दिग्दर्शन व उत्कृष्ट सूत्रसंचालना द्वारे रसिकांना हसवणारे डॉ. निलेश साबळे आणि संगीतकार व गायक अमितराज यांना “मृद्गंध” हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे ८ वा स्मृति संगीत समारोह व मृदगंध पुरस्काराचे भव्य आयोजन सोमवार दि. २६ नोव्हेंबर, २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे करण्यात आले आहे. याप्रसंगी सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. विनोदजी तावडे, माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. सुशीलकुमार शिंदे, मुंबई भाजपा अध्यक्ष मा. श्री. आशिषजी शेलार हे उपस्थित राहणार असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या समारोहाच्या निमित्ताने संगीत कार्यक्रम आयोजित केला असून त्यात शिवमणी (तालवादन – फ्युजन), राहुल देशपांडे (शास्त्रीय गायन), कडूबाई खरात (लोकसंगीत गायन) यांचा सहभाग असणार आहे.
२६ नोव्हेंबर हा लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा स्मृतिदिन. हया स्मृतिदिनानिमित्त संगीत समारोहाबरोबरच कला,सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या वतीने मान्यवरांना “मृदगंध पुरस्कार” हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. आतापर्यंत ज्येष्ठ साहित्यिक सौ. अरुणाताई ढेरे,शास्त्रीय नृत्य (कथ्थक) डॉ. सौ. मंजिरी देव, पत्रकार व लेखक जयंत पवार, अभिनेता सुबोध भावे, ढोलकी सम्राट राजाराम जामसंडेकर अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असून पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, पं. रोणू मजुमदार, मयुर वैद्य, आदिती भागवत, गणेश चंदनशीवे, पं. तौफिक कुरेशी, आरती अंकलीकर टिकेकर, पं. रविंद्र चारी, शर्वरी जमेनीस, पं. शौनक अभिषेकी, शकुंतलाबाई नगरकर यांचा संगीत समारोहामध्ये सहभाग लाभला आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे सुपुत्र नंदेश उमप हे गेली सात वर्ष हा उपक्रम राबवित आहेत.