Oscar 2019 : जाणून घ्या, कोणत्या चित्रपटाने पटकावला होता पहिला ऑस्कर पुरस्कार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 03:03 PM2019-02-24T15:03:11+5:302019-02-24T15:04:03+5:30
यंदाच्या ९१ व्या ऑस्कर पुरस्कारवर कोण आपले नाव कोरणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्करपुरस्कार कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासही सिनेप्रेमी उत्सूक आहेत.
यंदाच्या ९१ व्या ऑस्कर पुरस्कारवर कोण आपले नाव कोरणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. त्यातही सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्करपुरस्कार कोण जिंकणार, हे जाणून घेण्यासही सिनेप्रेमी उत्सूक आहेत. सिनेप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना अवघ्या काही तासांतच ऑस्करपुरस्कारांची घोषणा होणार आहे. तत्पूर्वी पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कुण्या चित्रपटाने पटकावला, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पहिला ऑस्कर पुरस्कार पटकावणा-या चित्रपटाचे नाव होते, ‘विंग्स’. १९२७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक मूकपट होता, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
‘विंग्स’ ना केवळ सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार पटकावणारा पहिला चित्रपट होता, तर ही उपलब्धी मिळवणारा एकमेव मूकपट होता. १९२९ मध्ये पहिला अकॅडमी पुरस्कार सोहळा पार पडला होता. या सोहळ्यात ‘विंग्स’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला होता. बोलपटांमुळे मूकपटांचा काळ जवळ जवळ संपला होता आणि त्या काळात ‘विंग्स’ या मूकपटाने ऑस्करवर आपले नाव कोरले होते.
‘विंग्स’ ही दोन मित्रांची कथा होती. पहिल्या महायुद्धदरम्यान हे दोन मित्र फायटर पायलट बनतात. क्लारा बो, चार्ल्स ‘बडी’ रोजर आणि रिचर्ड एरलन यात प्रमुख भूमिकेत होते. या मूकपटाची प्रचंड चर्चा झाली होती. याला कारण म्हणजे, या चित्रपटात केवळ हवाई युद्ध दाखवले गेले नव्हते तर क्लारा बोचे एक अर्धनग्न दृश्यही होते. याशिवाय पॅरिसमधील एका बारमधील दृश्य आणि पुरूषांमधील चुंबन दृश्यही होते. हा चित्रपट त्याकाळातील सर्वात अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात आला होता. मूक चित्रपटांच्या अस्ताच्या काळात चित्रीत करण्यात आलेला हा चित्रपट सर्व मोठ्या शहरात पडद्याच्या मागे लाईव्ह साऊंड इफेक्ट्स लावून रिलीज करण्यात आला होता.