बेवारस कुत्रा ४०० किलोमीटर अंतर कापून घरी येतो तेव्हा...
By अतुल कुलकर्णी | Published: October 13, 2024 07:00 AM2024-10-13T07:00:00+5:302024-10-13T07:00:00+5:30
एका कुत्र्याचे मालकावरील प्रेम, निष्ठा आणि आव्हानांचा सामना करण्याची त्याची क्षमता ही या कथेची बलस्थाने. त्यामुळेच हा सिनेमा थेट हृदयाला स्पर्श करतो. ४०० किलोमीटरचे अंतर बेला कसा पार करतो, हा अनुभव चित्रपट पाहूनच घेतला पाहिजे.
अतुल कुलकर्णी -
नुकतेच प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांचे प्राणी प्रेम सर्वश्रुत आहे. त्यांनी भटक्या कुत्र्यांसाठी केलेल्या प्रयत्नांच्या अनेक कथा समोर आल्या. प्राण्यांना आपण कसे वागवतो ? कसे सांभाळतो ? परदेशात प्राण्यांना कसे सांभाळले जाते ? यांतील फरक दाखवण्याचे काम ‘ए डॉग्स वे होम’ हा चित्रपट करतो. कुत्रा, मांजर यावर आधारित अनेक सिनेमे आपण पाहतो. आपल्याकडे देखील अशा प्राण्यांवर सिनेमे येतात; मात्र त्यात कुत्र्याचे किंवा मांजराचे भावविश्व कुठेच नसते. असाच एक सिनेमा नुकताच पाहण्यात आला ‘ए डॉग्स वे होम’. डब्ल्यू. ब्रूस कॅमेरॉन यांनी सत्य घटनांचा आधार घेत एक कादंबरी लिहिली. त्याच कादंबरीच्या नावाचा हा सिनेमाही आहे. सिनेमाचा हीरो अर्थातच ‘बेला’ हा डॉग आहे. एका पडक्या बांधकामाच्या जागी वेगवेगळ्या मांजरांसोबत कुत्र्याचे पिल्लूही सापडते. त्याच्या आईला मोकाट प्राणी पकडणारे अधिकारी पकडून नेतात.
ते निराधार पिल्लू त्याच एरियात राहणाऱ्या लुकस नावाच्या तरुणाला सापडते. तो त्या पिल्लाला घरी आणतो. त्याला वाढवतो; मात्र पिटबुल जातीचा डॉग घरात सांभाळणे किंवा पाळणे हा डेन्व्हरच्या कायद्याने गुन्हा असतो. ज्या पडक्या जागेत बेला सापडतो, त्या जागेच्या मालकाचे आणि लुकसचे भांडण झालेले असते. त्यामुळे तो तिथल्या प्राण्यांची निगराणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करतो आणि बेलाला पकडून नेण्यासाठी दबाव आणतो.
अधिकारी बेलाला पकडून नेतात. याला आपण डेन्व्हरपासून दूर नेतो असे सांगून लुकस त्याला सोडवून आणतो. ज्या ठिकाणी पिटबुल सांभाळणे गुन्हा अशा ठिकाणी तो बेलाला नेऊन सोडतो. बेलाला लुकसकडे जायचे असते. त्यामुळे तो त्या घरातूनही पळून जातो आणि रस्ता चुकून तो जंगलात भरकटतो. तिथेच तो जे मिळेल ते खातो आणि घराचा रस्ता शोधत राहतो. वर्ष-दीड वर्ष या प्रवासात जातात. अखेर बेला घराचा मार्ग शोधत शोधत डेन्व्हरमध्ये जातो. या प्रवासात बेलाचे बालपण मांजरांसोबत जाते. तर तो थोडा मोठा होत असताना त्याला एक वाघाचे पिल्लू सापडते. त्याला तो वाचवतो. बेला डॉग आणि वाघाचे पिल्लू यांच्यात मैत्री होते. तो सगळा प्रवास खिळवून ठेवणारा आहे. त्यांच्यातील संवाद अनेकदा डोळ्यांत पाणी आणतात. कुठेही डॉगला अतिशयोक्ती करताना दाखवलेले नाही. तो स्वतः स्वतःची कथा सांगतो. आपणही त्यात गुंतून पडतो.
शास्त्रज्ञ रुपर्ट शेल्ड्रेक यांच्या संशोधनानुसार कुत्रे आणि इतर प्राण्यांमध्ये ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचा वास किंवा परिसर त्यांच्या मेंदूत पक्का नोंदवला जातो. त्यामुळे कितीही अंतर असले तरीही ते आपले घर शोधत परतण्यात यशस्वी ठरतात. ४०० किलोमीटरचे अंतर बेला कशा पद्धती कापतो, हा अनुभव घेतला पाहिजे. या तर्काचा आधार घेत हा सिनेमा तुमच्यासमोर एक वेगळे भावविश्व उभे करतो. एका कुत्र्याचे स्वतःच्या मालकावर असलेले प्रेम, निष्ठा आणि आव्हानांचा सामना करण्याची त्याची ताकद ही या कथेची बलस्थाने आहेत. त्यामुळेच हा सिनेमा थेट हृदयाला स्पर्श करतो.
चित्रपटाची कथा एक घर सोडून पळालेला कुत्रा, त्याच्या घरी परत जाण्यासाठी किती आणि कशी धडपड करतो याचे चित्तथरारक अनुभव तुमच्यासमोर उभा करतो. काही दृश्यांमध्ये त्या कुत्र्याची शूरता आणि जिवंत राहण्याची तळमळ आपल्याला प्रेरणा देते. एक मुका प्राणी स्वतःच्या घरी जाण्यासाठी आणि जिवंत राहण्याकरिता जी धडपड करतो ती पाहिल्यानंतर आपल्यालाच आपली काही वेळा लाज वाटू लागते...
बेलाच्या भावनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कॉम्प्युटर ग्राफिक वापरून काही दृश्ये तयार केली गेली आहेत; मात्र त्यातून बेलाच्या हावभावामध्ये मानवी भावनांची झलक दिसते. चार्ल्स मार्टिन स्मिथ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अप्रतिम निसर्ग सौंदर्य तुमच्यापुढे उभे राहते. बेलाच्या प्रवासातील कठीण परिस्थिती, थंडी, हिमवृष्टी, उघड्या आकाशाखालील प्रवास आणि जंगलातल्या निरनिराळ्या प्राण्यांचा धोका उत्कटतेने उभा करण्यात आला आहे. प्राण्यांचे आपापसातील प्रेम आणि त्यांचे माणसांवरचे प्रेम हा विषय यातून अप्रतिमपणे मांडला गेला आहे. एका दृश्यात बेला एकाकी डोंगरात वाघाच्या पिल्लाला एक आई म्हणून वागणूक देते त्यातून त्याची प्रचंड संवेदनशीलता दिसते अशी दृश्यं चित्रपट पाहताना आपल्या मनावर भावनिक परिणाम करून जातात. प्राण्यांच्या मानसिकतेबद्दल विचार करायलाही भाग पाडतात.
जो कुत्रा आपल्या घरी परत जाण्यासाठी चारशे किलोमीटरचे अंतर पार करतो त्याला परत आणण्यासाठी घरचे काय प्रयत्न करतात ? त्यांची काय घालमेल आहे ? हा विषय मात्र या चित्रपटात आलेला नाही. तो आला असता तर हा चित्रपट आणखी वेगळ्या उंचीवर गेला असता. एक मात्र नक्की हा सिनेमा तुम्हाला अस्वस्थ करतो. प्राण्यांविषयीचे प्रेम तुमच्या मनात जागे करतो. एक हळवेपणा तुम्हाला स्पर्शून जातो.