एफएम रेडिओवर नळावरची भांडणे, स्पर्धा इतकी तीव्र
By मनोज गडनीस | Published: January 15, 2023 11:39 AM2023-01-15T11:39:41+5:302023-01-15T11:41:36+5:30
अलीकडे एफएम रेडिओवरून संगीताच्या सुरांऐवजी नातेसंबंधांतील भांडणाचेच सूर जास्त कानी पडत आहेत.
मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी
आपला ग्राहक वर्ग वाढविण्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील माध्यमांतर्फे नवनवीन क्लृप्त्या लढविल्या जातात. ही स्पर्धा आता इतकी तीव्र झाली आहे की, ही माध्यमे आता थेट लोकांच्या घरातच नव्हे, तर संसारात घुसली आहेत.
अलीकडे एफएम रेडिओवरून संगीताच्या सुरांऐवजी नातेसंबंधांतील भांडणाचेच सूर जास्त कानी पडत आहेत.
मुद्दा असा की,अशाच एका अग्रगण्य एफएम रेडिओ चॅनलने अलीकडेच नातेसंबंधातील पारदर्शकता जोखण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, लोकांना आव्हान केले जाते की, तुमच्या संसारात किंवा तुमच्या जोडीदाराबद्दल तुम्हाला काही संशय असेल तर आम्हाला कळवा. आम्ही रेडिओवरून तुमचा संशय दूर करू शकतो किंवा तुमच्या संशयाची खात्री करून देऊ शकतो. या आवाहनानंतर आर. जे. अर्थात रेडिओ जॉकी जो नंबर देतो तिथे लोक आपल्या जोडीदाराचे नाव आणि मनात ज्या व्यक्तीबद्दल संशय आहे त्याचे नाव तसेच आपल्या जोडीदाराचा नंबर त्याला कळवतात. दुपारपर्यंत ही माहिती जमा झाली की, मग संध्याकाळी रेडिओ जॉकी ज्याच्याबद्दल अशा शंका आहेत, त्याला फोन करतो. आपण कोणत्या तरी रिसॉर्ट किंवा पंचतारांकित हॉटेलमधून बोलत असून, आम्ही काही लकी नंबर निवडले आहेत. त्यात तुमचा नंबर सिलेक्ट केलेला आहे आणि त्याद्वारे तुम्हाला एक रात्र-दोन दिवस किंवा दोन रात्र-तीन दिवस असे राहण्याची आमच्या रिसॉर्टमध्ये ऑफर देण्यात येत आहे. याकरिता कोणतेही शुल्क लागणार नाही. तर तुम्हाला इथे यायला आवडेल का आणि तुम्हाला कोणाबरोबर यायचे आहे, त्याचे नाव सांगा? असे प्रश्न विचारले जातात. असा फोन आल्यानंतर अनेक लोक ही ऑफर स्वीकारत त्यांना ज्या व्यक्तीसोबत जायचे आहे त्याचे नावदेखील सांगतात. यानंतर आर. जे. पाचच मिनिटांत तुम्हाला कन्फर्मेशनचा कॉल येईल, असे सांगतो.
...आणि मग
पतीला पत्नीवर संशय असेल किंवा पत्नीला पतीवर संशय असेल आणि जर त्यांचा भांडाफोड झालेला असेल तर फक्त आणि फक्त वाद, गदारोळ, भांडणे आणि बिप बिपच्या आडून ऐकू येणाऱ्या शिव्या..., असे सारे काही पुढची दीड मिनिटे तरी यथासांग चालते.
...मग दोन गाणी लागतात
गाणी ऐकून झाली की, पुन्हा त्या व्यक्तीला आर. जे. फोन लावतो आणि सांगतो की, तुमची ऑफर आम्ही कन्फर्म केलेली आहे. मात्र, सध्या आपल्यासोबत तुमच्या ओळखीची आणखी एक व्यक्ती आहे तिला तुमच्याशी बोलायचे आहे. असे करून मग, आर. जे. त्या व्यक्तीची ओळख करून देतो.