सिद्धीविनायक न्यासच्या अध्यपदावरुन पायउतार झाल्यानंतर आदेश बांदेकरांना अश्रू अनावर, जुना Video शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 04:32 PM2023-11-08T16:32:36+5:302023-11-08T16:42:13+5:30
आदेश बांदेकरांनी कार्यकाळातील एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते रडत आहेत.
शिवसेना सचिव आदेश बांदेकर (Adesh Bandekar) गेल्या ६ वर्षांपासून मुंबईच्या सिद्धीविनायक न्यासचे अध्यक्ष होते. नुकतंच त्यांना या पदावरुन हटवण्यात आलं असून आता शिवसेना आमदार सदा सरवणकर अध्यक्षपदावर आले आहेत. या सहा वर्षात आदेश बांदेकरांनी मंदिराचा कार्यभार सांभाळला. दरम्यान आदेश बांदेकरांनी कार्यकाळातील एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते रडत आहेत.
सिद्धीविनायक न्यासच्या अध्यक्षपदावरुन हटवल्यानंतर आदेश बांदेकरांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. १२९ कर्मचारी जे कमी मानधनात काम करत होते त्यांची नोकरी कायम रहावी यासाठी बांदेकरांनी पाठपुरावा केला. तेव्हाचा तो क्षण आहे जेव्हा बांदेकरांना अश्रू अनावर झाले होते. सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना अक्षरश: खांद्यावर उचलून आनंद साजरा केला होता.
या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन देत लिहिले, "क्षण आनंदाचा… २४ जुलै २०१७ रोजी कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘श्री सिद्धिविनायक मंदिर’ न्यासाचा अध्यक्ष म्हणून सेवा करण्याचा आशीर्वाद मला मिळाला आणि तिथून २३ जुलै २०२३ पर्यंतची ६ वर्षं अविस्मरणीय गेली. न्यासाच्या माध्यमातून, विश्वस्त मंडळाच्या सहकार्यातून अनेक चांगली कामं आणि भाविकांची सेवा करता आली. श्री सिद्धिविनायकाचा महिमा प्रत्यक्ष अनुभवता आला. पण ह्या साऱ्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण होता, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे १२९ अस्थायी कर्मचारी जे अनेक वर्ष अल्प मानधनात काम करत होते, त्यांची नोकरी कायम व्हावी ह्यासाठी पाठपुरावा करून त्यांना सेवेत कायम करण्याचा! २०१९ सालच्या अंगारक चतुर्थीचा तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही…हे काम मी केले नाही, श्री सिद्धिविनायकांनी करुन घेतले."
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत भावना व्यक्त केल्या आहे. आदेश बांदेकरांच्या कामाचं कौतुक केलं असून ज्यांनी तुम्हाला हटवलं त्यांना धडा शिकवा अशीही कमेंट केली आहे.