"आम्ही गुजराती पिक्चर करतो आहोत का?" 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची नवी पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:43 AM2024-10-11T10:43:06+5:302024-10-11T10:50:38+5:30
आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी त्यांच्या एका सिनेमाविषयी खास पोस्ट करुन आठवण सांगितली आहे (milind gawali)
'आई कुठे काय करते'मधील लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर खास पोस्ट करुन त्यांच्या संत सखू सिनेमाविषयीची आठवण सांगितली आहे. मिलिंद गवळी लिहितात, ""अशी होती संत सखू" सुभाष शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला आणि जी सी गुप्ता यांनी निर्मित केलेला, हा मराठी पौराणिक चित्रपट, चित्रपटाचं संपूर्ण शूटिंग हे गुजरातच्या राजपिपला या शहरांमध्ये, राजपिपला पॅलेस मध्ये झालं, या भव्य दिव्य पॅलेस मध्ये आम्ही जवळजवळ महिनाभर होतो, आम्ही मोजके लोक मुंबईवरून गेलो होतो, बाकीचे इक्विपमेंट्स लाईटमन आणि इतर आर्टिस्ट हे सगळे गुजरात मधले होते, बर्याच वेळेला मला भास व्हायचा की आम्ही गुजराती पिक्चर करतो आहोत का?
भाषा गुजराती, जेवण गुजराती, वातावरण गुजराती."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "राजपिपला हे शहर काय फार मोठं नाही, मी रोज पहाटे लवकर उठून माझा डीएस्एल्आर कॅमेरा गळ्यात लटकवून फेरफटका मारायला जायचो, सुंदर वातावरण सुंदर परिसर असंख्य हिरवीगार झाडी, वेगवेगळे रंगीबेरंगी पक्षी, गाई आणि त्यांची वासरं, महिनाभर राजकीपला पॅलेस मध्येच माझी राहायची सोय केली होती, मी सिनेमाचा हिरो होतो म्हणून आणि मी सुभाष शर्मा यांचा लाडका होतो म्हणून मला महाराजा रूम दिली होती, मुंबईत राहिलेल्या माणसाला अशा राजेशाही महालांमध्ये राहण्याची जेव्हा संधी मिळते, तेव्हा एक वेगळंच feeling असतं, या सिनेमाची एक जमेची बाजू म्हणजे या सिनेमाचा कॅमेरामन, तो होता चंद्रशेखर रथ , तो ऍडव्हर्टायझिंग आणि ऍड फिल्म्स करायचा, त्यामुळे ही फिल्म सुद्धा तो ऍड फिल्म सारखी शूट करत होता, मला त्याचे अँगल्स आणि शॉट्स आवडायचे, सुभाष शर्मा आणि गुप्ता यांना हा सिनेमा यात्रेसाठी बनवायचा होता, बीसी सेंटर साठी करायचं होता."
मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "तेलुगु का तमिलमध्ये संत सखु चित्रपट खूप चालला होता, आणि 1941 मध्ये संत सखू नावाचा कृष्णधवल चित्रपट विष्णुपंत गोविंद दामले यांनी दिग्दर्शित केला होता, हौंसा वाडकरने संत सखुचं काम केलं होतं, आणि मी जी भूमिका केली आहे ती शंकर कुलकर्णी यांनी केली होती, classic मध्ये मोडला जातो हा चित्रपट, मला त्या धांगडधिंगा सिनेमा पेक्षा, अशा प्रकारच्या कथा मला आवडतात, म्हणजे मला धांगडधिंगा आवडत नाही असं नाही, पण अशा प्रकारच्या कथा माझ्या आईला आवडायच्या, ती खूप सात्विक देव भोळी होती, परमेश्वरावर तिचा अपार विश्वास, श्रद्धाळू होती, असे सिनेमे ती तिच्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन जाऊन बघायची, मलाही फार आनंद व्हायचा, घर चालवायला दोन पैसेही पदरात पडायचे, महिनाभर राजेशाही पॅलेस मध्ये राहायला मिळायचं, आणि एका चांगल्या युनिट बरोबर चांगल्या लोकांबरोबर काम केल्याचं समाधान मिळायचं. अजून या सिनेमाविषयी विचार केला की एक good feel , राग रुसवे भांडण तंटे न करता , अश्लील भाषा शिव्या कानावर न पडता सिनेमा पूर्ण झाल्याचं समाधान."