'आई कुठे काय करते'मधील या अभिनेत्रीला गोठ्यात घ्यावा लागला होता आसरा, पहाटे ३ वाजता उठून करावी लागतो होती आंघोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 07:00 AM2021-08-07T07:00:00+5:302021-08-07T07:00:00+5:30
'आई कुठे काय करते' मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.
'आई कुठे काय करते' मालिकेत संजनाच्या भूमिकेतून अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहचली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. रुपालीने आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप लोकप्रियता मिळवली आहे. मात्र तिच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा तिला आणि तिच्या कुटुंबाला गुरांच्या गोठ्यात राहावे लागले होते.
रुपाली भोसलेने स्वप्नील जोशीच्या ‘शेअर विथ स्वप्नील’ या रेडिओ शोमध्ये तिच्या आयुष्यातील वाईट प्रसंगाबद्दल सांगितले. तिने सांगितले की, तिचा जन्म मुंबईचाच. वरळीच्या बीडीडी चाळीत तिचे बालपण गेले. इतरांप्रमाणेच रूपालीला देखील खूप शिकायची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. ती इयत्ता नववीत असताना तिच्या काकाने एका स्कीमच्या नावाने तिच्या वडिलांकडे होते नव्हते तितके सगळे पैसे नेले. या स्कीममध्ये तिच्या काकाला तर अटक झाली, मात्र रूपालीचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आले. होते ते पैसेदेखील संपले, उपासमारीची वेळ आलेल्या रूपालीला इयत्ता नववीतच शिक्षण सोडावे लागले. इथूनच तिच्या आयुष्यातील तो वाईट काळ सुरु झाला होता.
ती पुढे म्हणाली की, अशावेळी तिच्या काकीने घर विकून तिच्याकडे येऊन राहण्याचा सल्ला दिला. रुपालीच्या कुटुंबाला तो पटला आणि त्यांनी आपले राहते घर विकले. मात्र, त्या काकीने देखील त्यांना धोका दिला. त्यांच्याकडील पैसे घेऊन तिने रुपालीच्या संपूर्ण कुटुंबाला भर पावसात घराबाहेर काढले होते. अशावेळी रुपाली आणि तिच्या लहानग्या भावाला घेवून तिचे आई-वडील रस्त्याच्या आडोश्याला आश्रयाला गेले होते. मुले भिजू नयेत म्हणून आईने दोघांच्या डोक्यावर ताडपत्री धरली होती. याचा काळात तिच्या आईला दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला.
रुपाली आणि तिच्या कुटुंबाची दुर्दशा तिच्या वडिलांच्या एका मित्राला कळली. त्यांनी या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या घरी नेले. मात्र, तेच कुटुंब आधीच मोठे असल्यामुळे थोडीशी अडचण निर्माण झाली होती. तरीदेखील एक रात्र या मित्राने आणि त्यांच्या कुटुंबाने या कुटुंबाचा सांभाळ केला. दुसऱ्या दिवशी त्याच मित्राच्या ओळखीने एक छोटी पत्र्याची खोली मिळाली. या खोलीत आधी गुरे बांधली जात होती. पत्र्याच्या भिंती असलेल्या या घरात आश्रय तर मिळाला, पण भितींना बरीच छिद्र पडलेली होती. या छिद्रातून आत डोकावून पाहिले जायचे. त्यामुळे रूपालीला पहाटे ३-३.३० वाजता उठून काळोखात आंघोळ करावी लागत होती.
यादरम्यान एकदा रुपालीच्या भावाच्या मनात आत्महत्येचा विचार आला तो ऐकून रुपाली खूप घाबरली. तिने गोरेगावमध्ये एक छोट्याशा नोकरीला सुरुवात केली. महिनाकाठी अडीच हजार पगार मिळत होता आणि त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.
रुपाली सांगते की, खरेतर तिला शिकून खूप मोठे व्हायचे होते, मात्र तसे झाले नाही. पण ती तिच्या भावाला आजही सांगते की तू तुला हवे तेवढे आणि हवे ते शिक. आता पुन्हा आपल्याला जुन्या दिवसांचा विचार देखील करायचा नाही.