अन् पुन्हा एकदा मला भरून आलं..., ‘आई कुठे काय करते’मधील ‘अरूंधती’ची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 04:18 PM2021-12-21T16:18:42+5:302021-12-21T16:24:24+5:30
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत ‘अरूंधती’ची भूमिका साकारणाऱ्या मधुराणीची पोस्ट एकदा वाचाच
टीआरपीचे अनेक विक्रम मोडीत काढणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकलीत. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा चाहत्यांच्या पसंतीत उतरली आहे. सर्वाधिक गाजली आणि गाजतेय ती अरूंधतीची व्यक्तिरेखा. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani gokhale Prabhulkar) हिने ही व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. तूर्तास अरूंधतीची भूमिका जिवंत करणाऱ्या मधुराणीची एक पोस्ट चर्चेत आहे.
होय,‘आई कुठे काय करते’मधील अरूंधती या भूमिकेशी संबंधित एक भावुक पोस्ट तिने शेअर केली आहे. एका फॅनपेजने शेअर केलेला व्हिडीओ पोस्ट करत, मधुराणीने ही पोस्ट शेअर केली आहे. इंस्टा वरच्या एका फॅनपेजनी आज हे शेअर केलं आणि पुन्हा एकदा मला भरून आलं, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मधुराणी लिहिते...
‘आपण आपल्या आयुष्यात कधीही न केलेली गोष्ट करून पाहतो. आपल्या सोयीच्या परिघाबाहेर पडून काहीतरी नवीन शिकतो, तेव्हा आपण आपल्याला खरे सापडायला लागतो. जशी या छोट्या छोट्या पावलातून अरुंधतीला तिचं स्वत्व सापडत गेलं. इंस्टावरच्या एका फॅनपेजनी आज हे शेअर केलं आणि पुन्हा एकदा मला भरून आलं. आतून आतून कृतज्ञ वाटलं त्या प्रत्येकाविषयी ज्यांच्यामुळे मी ही भूमिका करू शकले आणि करू शकतेय. आज वेगवेगळ्या स्तरातल्या मला अनेक स्त्रिया भेटतात. गृहिणी असतात, शिक्षिका असतात, आॅफिसर असतात, उद्योजिका असतात. वेगवेगळ्या वयाच्या, वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातल्या.. पण त्यांच्या प्रत्येकीच्या डोळ्यात मला भेटून हलकं पाणी असतं. प्रत्येकीला अरुंधती मध्ये ती सापडली असते. कुठल्या न कुठल्या टप्प्यावर तिनी अरुंधतीकडून प्रेरणा घेतलेली असते. अरुंधतीनी तिला धीर दिलेला असतो, सावरलेलं, एक आशेचा किरण दाखवलेला असतो. अगदी मी स्वत: सुद्धा याला अपवाद नाहीये हं!
आमची अतिशय गुणी आणि हुशार लेखिका नमिता वर्तक, संवाद लेखिका मुग्धा गोडबोले आणि संवेदनशील दिग्दर्शक रवींद्र करमरकर सर, मी तर आहेच पण अशा असंख्य स्त्रिया तुमच्या आभारी आहेत आणि असतील,' अशा शब्दांत मधुराणीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मधुराणी मालिकेत एका सामान्य गृहिणीची भूमिका साकारत आहे. या मालिकेने टीआरपीचे अनेक विक्रम मोडले आहेत.
मालिकेत मधुराणीसह मिलिंद गवळी व अभिनेत्री रुपाली भोसलेची महत्त्वाची भूमिका आहे.