'या' लोकप्रिय अभिनेत्रीला सासऱ्यांनी शिकवला स्वयंपाक, म्हणाली - 'करिअर करण्यामध्ये इतकी व्यग्र होते की...'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 03:41 PM2024-07-09T15:41:35+5:302024-07-09T15:42:50+5:30
सध्या या मालिकेत 'महाराष्ट्राची सुगरण जोडी' ही स्पर्धा सुरू आहे.
छोट्या पडद्यावर 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने अरुंधती ही भूमिका साकारुन प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात स्थान मिळवलं. अरुंधती या पात्रावर प्रेक्षक खूप प्रेम करतात. मालिकेत तर आपल्याला माहितीच आहे की मधुराणी प्रभुलकर अर्थात अरुंधती ही उत्तम स्वंयपाक बनवते. पण, खऱ्या आयुष्यात स्वयंपाक करण्यात ती किती सुगरण आहे, याचा खुलासा नुकतंच तिने केला आहे.
सध्या या मालिकेत 'महाराष्ट्राची सुगरण जोडी' ही स्पर्धा सुरू आहे. यानिमित्ताने नुकतंच मधुराणी प्रभुलकरने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. यावेळी तिला 'तुझा आवडता पदार्थ कोणता? जो पदार्थ तू आईकडून शिकली आहेस आणि जो तुला उत्तम जमतोय' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, 'मी माझ्या आईसमोर कधीही कुठलाही पदार्थ शिकायला उभी राहिलेली नाही. मी खरंच सांगतेय. मला माझ्या सासऱ्यांनी स्वयंपाक शिकवला आहे. मी त्यांच्याकडून स्वयंपाक शिकले. कारण पत्नी गेल्यानंतर त्यांनी तूप कडवण्यापासून सगळं स्वतः शिकून केलं. तेव्हा युट्यूब वगैरे काहीही नव्हतं. तेव्हा ते आजूबाजूच्या बायकांना भेटून रेसिपी उतरवून स्वयंपाक करायला शिकले. त्यांच्यापाशी मी उभं राहून स्वयंपाक शिकले. आजही मला माशाची आमटी बनवता येत नाही. मी आईकडून मी काहीच शिकले नाही. पण ती खूप छान सुगरण आहे'.
मधुराणी पुढे म्हणाली, "मी माझ्या करिअर, कॉलेज आणि वेगवेगळ्या गोष्टी करण्यामध्ये इतकी व्यग्र होते की आईकडून स्वयंपाक शिकायचं राहून गेलं. तिने मला कधी असं म्हटलं नाही, हे शिकून घे, ते शिकून घे, हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. तिला माहितीये, वेळ पडल्यावर शिकले. पण आमच्याकडे उलट आहे. माझ्या मुलीला खूप स्वयंपाकाची आवड आहे. तिला वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप आवडतात. ती मोमोज करते, पिझ्झा करते. ती स्वयंपाक करण्यात खूप उत्साही आहे. शाळेतूनही आल्यावर एखादा पदार्थ युट्यूबवर शोधून ती बनवते. तिला खूप आवड आहे. मला ती करून घालते'.
दरम्यान 'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती-मिहिर, संजना-अनिरुद्ध यांच्यात स्पर्धा होणार आहे. अरुंधती आणि मिहीरला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी अनिरुद्ध आणि संजनाने देखिल कंबर कसली आहे. समृद्धी निवास पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची गरज आहे. स्पर्धा जिंकून पैसे कमावून समृद्धी बंगला वाचवता यावा म्हणूनच अरुंधती महाराष्ट्राची सुगरण स्पर्धेत भाग घेणार आहे. अरुंधतीला साथ देणारा मिहीर शर्मा उत्तम शेफ आहे. मात्र अरुंधती जिंकू नये यासाठी अनिरुद्ध आणि संजना देखिल या स्पर्धेत उतरले आहेत. त्यामुळे आता कोण जिंकणार हे पाहायचं आहे