"अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे"; आईसाठी लिहिलेली मिलिंद गवळींची भावनिक पोस्ट व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 03:15 PM2023-03-08T15:15:00+5:302023-03-08T15:15:00+5:30
Milind gawali : अलिकडेच त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी (milind gawali). या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारुनही त्यांनी विशेष लोकप्रियता मिळवली आहे. अनिरुद्ध म्हणून लोकप्रिय झालेले मिलिंद गवळी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे त्यामुळे बऱ्याचदा ते चाहत्यांसोबत त्यांच्या जीवनातील सुख-दु:ख शेअर करत असतात. यात अलिकडेच त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"..आज चौदा वर्ष पूर्ण झाली माझ्या आईला जाऊन. २ मार्च २००९ संध्याकाळी ६ वाजता. माझ्या आईची गुरु, गुरुमाई चित्विलासानंद यांचा जप करत करत ती निघून गेली, अफाट श्रद्धा आणि प्रेम,श्रद्धा आणि सबुरी हे तिचं ब्रीदवाक्य होतं,असीम प्रेम , सतत इतरांची सेवा, आपल्याला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करत राहणे, कोणालाही कधीही दुखवू नये , लोकांची मनं सांभाळावी, भुकेलेला दोन घास खाऊ घालावे , मग तो मग तो कोणीही असो , मालक असो ड्रायव्हर असो राजा रंक असो, नातेवाईक असो ओळखीचा असो किंवा अनोळखी असो, अतिथी देवो भव, स्वतःआधी दुसऱ्याचा विचार करावा, प्रेमाशिवाय जगामध्ये दुसरं काहीही महत्त्वाचं नाही.असंख्य उपवास, पूजा पाठ, देवदर्शन,शिर्डीच्या साईबाबांनी नवसाने मुलगा दिला, मुंबईच्या महालक्ष्मीने मुंबईत राहायला घर दिलं, शेगावच्या गजानन महाराजांनी मुलाचे शिक्षण पूर्ण केलं, वैष्णव देवीने नवऱ्याला नोकरीत यश दिलं, तिच्या प्रेमाच्या माणसांना जे काय हवं असेल ते ती परमेश्वराकडं मागून घ्यायची, आणि त्याला द्यावं लागायचं, त्याला नवस बोलायची आणि तो नवस ती आवर्जून फेडायची, संतोषी मातेचे व्रत असो ,नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असो, गुरूवारचा साईबाबाचे उपास तर आहे, सोमवारी शंकराचा उपवास, शनिवारी शनीचा उपवास,बुधवारी माहीम चर्च ला जायचं, मदर मेरी शी सुद्धा तिची मैत्री होती, शुक्रवारी माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यात जायचं, ती अशी होती की अल्ला सुद्धा तिचं सगळं ऐकायचे, असं मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पुढे ते लिहितात, माझी बहीण संगीता तिची दहावीची परीक्षा, दुसऱ्या दिवशी कुठलं तरी विषयाचा paper होता आणि घरी पाहुणे आले, आई माझ्या बहिणीला म्हणाली "अग काळजी करू नको मार्क काय तुला माझे परमेश्वर भरपूर देईल, अभ्यास सोड आणि मला स्वयंपाकात मदत करायला ये", आणि निकाल लागला तर ती चांगल्या मार्गाने पासही झाली होती. खरच माझं पोस्ट ग्रॅज्युएशन तर तिच्या परमेश्वरा मुळेच पूर्ण झालंय, नाहीतर शिक्षणाचा आणि माझा 36 चा आकडा होता. तिच्या आशीर्वादाशिवाय आयुष्यात काहीही घडत नव्हतं आणि अजून ही नाही.ती जाऊन इतकी वर्ष झाली तरी सुद्धा ती आहे, आपल्या जवळच आहे आपल्याला ती कधी सोडून गेलेलीच नाही अशी सतत जाणीव असते. मला तर खात्रीच वाटते, की आई आता कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी बरोबर गप्पा मारत बसली असेल, तुळजापूरच्या भवानी मातेची सेवा करत बसली असेल, किंवा शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरात, किंवा मग सिद्धिविनायकाला मोगऱ्याचे गजरे करून देत असे. आणि ते करत असताना त्यांना आपल्या लेकरांना आपल्या माणसांना सुखी ठेव हेही सांगत असेल."मातृ देवो भव".
दरम्यान, त्यांची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहतेदेखील भावूक झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या आईविषयी आदर,प्रेम व्यक्त केलं आहे. तसंच चाहत्यांसोबत मराठीतील काही सेलिब्रिटींनीही कमेंट करत मिलिंद यांची समजूत घातली आहे.